वसई: मागील दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव यंदाच्या वर्षी धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. वसई विरार महापालिकेने त्याबाबत नियोजन सुरू केले असून यंदाच्या वर्षी गणेश मूर्तीना सहा फुटांपर्यंत उंचीची मर्यादा घातली आहे.गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून यावर्षी ३१ ऑगस्टपासून या उत्सवाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेनेही याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी गणेशोत्सवाच्या संदर्भात पालिकेच्या मुख्यालयात लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी व पालिका अधिकारी यांची बैठक घेतली. यात यंदाचा गणेशोत्सव र्निबध मुक्त साजरा होणार आहे. असे जरी असले तरी वसई विरारमध्ये ठेवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीच्या उंचीवर सहा फुटांपर्यंत र्निबध घातले आहेत.

मात्र प्लास्टर ऑफ पॅरिस ( पीओपी ) च्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे र्निबध घातले नाहीत, परंतु या पीओपीच्या मूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक करण्यात आले आहे.याशिवाय ज्यांच्या मूर्ती चार फुटांच्या पेक्षा जास्त उंचीच्या असतील त्यानांच त्या मूर्तीच्या विसर्जनाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच विसर्जनस्थळी उपाययोजना, पोलीस बंदोबस्त, गणेश मिरवणुका, वाहतूक नियोजन कारखानदार व सार्वजनिक मंडळाच्या बैठका याबाबतचे नियोजन करण्याचे काम सुरू केले आहे.

पालिका कृत्रिम तलाव तयार करणार
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल हळूहळू वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने शहरात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलाव उभारणी करण्यासाठी ठिकाणे निश्चिती व इतर नियोजन करण्याचे कामही सुरू असल्याचे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घेण्याचे आवाहन
पीओपीच्या गणेशमूर्ती व त्यांना रंगरंगोटी करण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक रंग यामुळे जलप्रदूषण होत असते. याचा फटका हा तलाव, नद्या यामधील जैविक घटकाला बसतो. यासाठी नागरिकांनी शाडू मातीच्या व पर्यावरणपूरक अशाचा गणेशमूर्तीची स्थापना केली तर पर्यावरणाच्या दृष्टीने ते उत्तम राहील यासाठी पर्यावरण गणेशमूर्ती घ्याव्यात, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

यावर्षी गणेशमूर्तीची उंचीची मर्यादा ही सहा फुटांपर्यंत ठेवली आहे. शहरातील गणेशोत्सव नियोजनबद्ध व शांततामय मार्गाने पार पडावा यासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे. – अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका