वसई: वसई विधानसभेतील सर्व उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हितेंद्र ठाकुरांसमोर येण्याचे विरोधक उमेदवारांनी टाळले. कॉंग्रेसने आपला प्रतिनिधी पाठवला तर भाजपच्या स्नेहा दुबे आल्याच नाहीत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी मैदान साफ असल्याने आपली भूमिका जोरदारपणे मांडून कार्यक्रमात वर्चस्व मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसईत न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी महासंघ आणि जागरूक नागरिक संस्थेतर्फे ‘विधानसभेसाठी आम्हीच का ? हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वसई विधानसभेतील सर्व उमेदवार जनतेशी संवाद साधून आपली बाजू स्पष्ट करणार होते. सत्ताधारी आमदार हितेंद्र ठाकूर यांना समोरासमोर जाब विचारण्याची चांगली संधी विरोधकांना होती. मात्र या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे विजय पाटील आणि भाजपच्या स्नेहा दुबे यांनी ठाकुरांसमोर यायचे टाळले. विजय पाटील यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून जिमी घोंन्सालविस यांनी बाजू मांडली. भाजपातर्फे कुणीच फिरकलं नाही.

हेही वाचा – मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा

प्रमुख उमेदवार गैरहजर असल्याने हितेंद्र ठाकूर यांनी मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेतला आणि आपण केलेल्या कामांची आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. वसईच्या विकासासाठी वीज प्रश्न, वाहतूक सेवा, रस्ते, उड्डाणपूल, उद्योग धंदे, परिवहन सेवा, रोजगार, आरोग्य सेवा, शाळा हस्तांतरण, जलवाहतूक, मेट्रो सेवा, परिवहन सेवा, वाढीव पाण्यासाठी केलेले प्रयत्न, अन्य भागासाठी दळणवळण दृष्टीने नवीन रस्त्यांची निर्मिती अशी अनेक कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. सध्या भेडसावणार्‍या समस्या लवकरच सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिली.

महाविकास आघाडीचे विजय पाटील यांच्या बाजूने ॲड जिमी घोंन्सालवीस यांनी बाजू मांडली. महाविकास आघाडीने वसईच्या विकासासाठी व्हिजन ठरविले असून आमचा आमदार निवडून आल्यास प्रामुख्याने वैद्यकीय विद्यालय, अद्यावत रुग्णालय, रोजगार, मच्छीमारांचे प्रश्न, २९ गावांचा प्रश्न, परिवहन सेवा, पायाभूत सुविधा, रेल्वे , मेट्रो, गुन्हेगारी नियंत्रण, पाणी, पर्यावरण असे प्रश्न आम्ही सोडवू असे सांगितले. जे ३५ वर्षात झाले नाही ते आम्ही पाच वर्षांत करून दाखवून असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या

विरोधकांच्या अनुपस्थितीची चर्चा..

प्रत्यक्षात सर्वच उमेदवार या ठिकाणी यायला हवे होते. आताच ते उमेवार जनतेसमोर येत नाहीत तर मग नंतर ते आमचे प्रश्न कसे सोडवतील अशा भावना यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या. २०१९ च्या निवडणुकीच्यावेळी देखील विरोधकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्याचीच यंदा पुनरावृत्ती झाली. विरोधकांना मला प्रश्न विचारण्याची संधी होती. मात्र ती संधीसुद्धा या विरोधकांनी गमावली असे ठाकूर यांनी सांगितले. कदाचित त्यांच्याकडे प्रश्न नसतील किंवा उत्तर मिळण्याची खात्री त्यांना आधीच झाली असावी असा टोलाही त्यांनी लगावला.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindra thakur vasai program opposition absent ssb