वसई : विरारच्या डोंगरपाडा मध्ये राहणार्‍या राज भगत या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करून नवीन इतिहास रचला आहे. कारण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वसईतील युपीएससी उत्तीर्ण होणारा तो पहिलाच तरुण ठरला आहे. राजने देशात २४५ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा तो आगरी समाजातील दुसरा तरुण ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परिक्षेचा निकाल नुकताच लागला आहे या परिक्षेत विरारच्या डोंगरपाडा येथे राहणारा राज नंदन भगत हा तरूण उत्तीर्ण झाला असून त्याने २४५ वा क्रमांक पटकावला आहे. वसई विरार मधून आजवर कुणीच भूमिपुत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झाला नव्हता. मात्र राज भगत याने ही परिक्षा उत्तीर्ण करून नवीन इतिहास लिहिला आहे. रात्री तो दिल्लीवरून घरी परतला. त्याच्याशी लोकसत्ताने त्याच्याशी संवाद साधल्यानंतर त्याने आपल्या यशाचे रहस्य आणि केलेल्या मेहनतीचे पैलू उलगडवून दाखवले.

आणखी वाचा-उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल

वकील बनायचे होते…

राज भगत हा प्रसिध्द वकील ॲड नंदन भगत यांचा लहान मुलगा आहे. दहावीपर्यंत तो विरारच्या जान २३ वे या शाळेत शिकला. १० वीला त्याला ९२ टक्के गुण मिळाले होते. मात्र वडिलांप्रमाणे वकील बनायचे असल्याने त्याने मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी तो १२ वी नंतर पुण्यातील प्रसिध्द आयएलएस लॉ महाविद्यालयात गेला. मात्र तेथे त्याने आयएएस बनण्याचे स्वप्न पाहिले आणि अभ्यासाला सुरवात केली. कायद्याची पदवी २०१९ मध्ये त्याने आयएएस बनण्यासाठी दिल्ली गाठली आणि खासगी क्लासेस लावले. मात्र लगेच करोना सुरू झाला आणि क्लासेस बंद पडले.

दररोज नियमित अभ्यास

करोनानंतर क्लासेस बंद पडल्यानंतर राजने एकट्याने (सेल्फ स्टडी) अभ्यास केला. त्याने ३ वेळा परिक्षा दिली होती. मात्र त्याला यश आले नव्हते. परंतु नाउमेद न होता तो अभ्यास करत होता. दररोज ७ ते ८ तास नियमित अभ्यास तो करत होता. या काळात तो दिल्लीला एकटाच राहून अभ्यास करत होता. मित्र, नातेवाईकांना त्याने दूर ठेवले होते. कुठल्याही लग्न समारंभात तो जात नव्हता. आपलं घऱ आणि वाचनालय एवढाच्या त्याने प्रवास केला. मागील दिड वर्ष तो विरारच्या घरी आला नव्हता. तो सकाळी आणि रात्री १० ते १५ मिनिटे फक्त समाजमाध्यमाचा वापर करत होता.

आणखी वाचा-सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित

आगरी समाजातील दुसरा तरुण

आगरी समाज हा वसई, पालघर, ठाणे आणि रायगड परिसरात आहे. मात्र या समाजातून यापूर्वी फक्त रवींद्र शिसवे हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा उत्तीर्ण झाले होते. रवीद्र शिसवे हे आयपीएस अधिकारी असून सध्या रेल्वे आयुक्त आहेत. आगरी समजातील दुसरा प्रशासकीय अधिकारी होण्याचा मानही भगत याला मिळाला आहे.

पुन्हा परिक्षा देण्याचा निर्णय

देशात २४५ वा क्रमांक मिळाला असली तरी राज समाधानी आहे. आणखा चांगला क्रमांक मिळविण्यासाठी त्याने पुन्हा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तो लगेच दिल्लीला रवाना होणार आहे. मला प्रशासकीय अधिकारी बनून लोकांची सेवा करायची आहे, असे त्याने सांगितले. राज भगत नम्र स्वभावाचा असून त्याने आपल्या यशाचे सारे यश त्याचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे. तरुणांनी नाउमेद न होता अभ्यासावर लक्ष केद्रीत केलं तर यश नक्की मिळेल, असा सल्ला त्याने तरुणांना दिला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History made by raj bhagat he became first young man from vasai to clear competitive examination mrj