वसई : श्रावणी सोमवार निमित्त तुंगारेश्वर येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दोन तरुणांना एका वाहनाने धडक दिली. या अपघातात दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रावणी सोमवारी तुंगारेश्वर येथील महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी भाविक जात असतात. सोमवारी पहिला श्रावणी सोमवार असल्याने प्रसाद आणि हितेश प्रजापती हे गोखिवरे येते राहणारे दोन चुलत भाऊ दर्शनासाठी निघाले होते.
पहाटे ६ वाजता त्यांनी आपली दुचाकी काढली आणि फादरवाडी पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले. तेथून मुख्य रस्त्यावर येत असताना भरधाव वेगाने जाणार्या इनोव्हा गाडीने त्यांना धडक दिली. या धडकेत ते दुरवर फेकले गेले. जखमी अवस्थेत त्यांना गोखिवरे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया कऱण्यात येत आहे. या अपघातात दोन्ही तरूण गंभीर जखमी आहेत. त्यांना धडक देणारी इनोव्हा गाडी वेगात होती. आम्ही त्या वाहनचालकाचा शोध घेत आहोत अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.