वसई– सत्ताबदलाचे पडसाद वसई विरारमध्ये दिसू लागल्याने राजकारण तापू लागले आहे. भाजपाने मॅरेथॉन स्पर्धेचा पिवळा रंग बदलल्यानंतर स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. त्यावर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला राजकारण करायचे आहे. मात्र मॅरेथॉनच्या आयोजनाची जबाबदारी घेण्याची ताकद आहे का असा सवाल त्यांनी केला. हिंम्मत असेल तर वसईचा कला क्रीडा महोत्सव देखील आयोजित करून दाखवा असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
हेही वाचा >>> मेट्रो ९ च्या कंत्राटदाराला ४० लाखाचा दंड; चालकाच्या मृत्यूनंतर एमएमआरडीएची कारवाई
पिवळा रंग हा बहुजन विकास आघाडी पक्षाचा आहे. त्यामुळे पालिकेचाही अधिकृत रंग पिवळा आणि हिरवा आहे. परंतु विधानसभेत सत्ता बदलानंतर राजकीय कुरघोडी सुरू झाल्या आहेत. मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनादरम्यान मंडप, कमानी, मार्गिकेतील झाली यावर असलेला पिवळा रंग काढून तो भगवा करण्यात आला होता. स्पर्धेचे आयोजन ठाकूरांच्या विवा महाविद्यालयता होते. ते ठिकाण बदलण्याचे प्रयत्न भाजपकडून झाले. मात्र यंदा वेळ कमी असल्याने ते शक्य झालं नाही. या राजकारणासंदर्भात हितेंद्र ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या पिवळ्या रंगाची ॲलर्जी झाली आहे तो पालिकेचा पिवळा आणि हिरवा हा अधिकृत रंग आहे. विरोधकांना मॅरेथॉनचे राजकारण करायचे आहे मग आयोजनाची जबाबदारी घेण्याची ताकद आहे का असा सवाल त्यांनी केला. मी ३५ वर्षांपासून कला क्रिडा महोत्सव करतो. वसईतील तो सर्वात मोठा महोत्सव आहे. तो मी विरोधकांना देण्यास तयारी आहे. त्यांनी तो आयोजित करून दाखवा असे आव्हानही दिले. यंदा स्पर्धेत भाजपचे लोक मिरवायला आले आहेत. मात्र तयारी करताना, मेहनत करताना ते कुठे नव्हते असाही टोला त्यांनी लगावला. खेळामध्ये मी कधी राजकारण केले नाही. कला क्रीडाच्या व्यासपीठावर नेहमी सर्व पक्षाच्या लोकांना स्थान असते असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>> प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
आम्ही राजकीय नाही तर राष्ट्रीय रंग दिला टिकेनंतर भाजपने मॅरेथॉनच्या सर्व कमानी, फलकांवरील भगवा आणि भाजपचा रंग काढला आणि तिरंगा रंग दिला आहे. सुरवातील उत्साहात भगवा रंग देण्यात आला होता. मात्र तो बदलला आहे. आम्ही मॅरेथॉनला राजकीय नाही तर तिरंगा हा राष्ट्रीय रंग दिला आहे, असे भाजपचे उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी सांगितले.