वसई: वसईच्या एव्हरशाइन आचोळे येथील पालिकेचे प्रस्तावित रुग्णालय वादात सापडले आहे. हे रुग्णालय स्मशानभूमीच्या जवळ होणार असल्याने स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत हे रुग्णालय होऊ देणार नाही, असा निर्धार स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर रुग्णालय आणि स्मशानाच्या मध्ये झाडांची भिंत उभारली जाईल, असा अजब तोडगा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी काढला आहे.
महापालिकेचे सध्या वसईत सर डी.एम. पेटीट आणि नालासोपारामध्ये तुळींज रुग्णालय अशी दोन रुग्णालये आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पालिकेने वसई पूर्वेच्या एव्हरशाईन आचोळे येथील भूमापन क्रमांक ६ मध्ये २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेवर आरक्षणदेखील टाकण्यात आले आहे. त्याला लागूनच स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीला लागूनच रुग्णालय तयार होणार असल्याने स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. रुग्णालयाची शहराला नितांत गरज आहे, पण स्मशानभूमीला लागून रुग्णालय असावे ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. ही स्मशानभूमी जुनी आहे. पालिकेला ते माहीत नव्हते का, असा सवाल करत माजी महापौर रुपेश जाधव यांनी विरोध केला आहे. पालिकेने अन्य ठिकाणी रुग्णालय उभारावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या भागातील नागरिकांचा जोरदार विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या विरोधामुळे रुग्णालयाचे काम रखडले आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी या वादावर तोडगा सुचवला आहे. नुकतीच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतला. रुग्णालयासाठी ही जागा मध्यवर्ती ठिकाण आहे. नागरिकांना जर स्मशानाच्या बाजूला रुग्णालय नको असेल तर दोघांच्या मध्ये झाडे लावून झाडांची भिंत उभारावी अशी सूचना त्यांनी केली आहे. मात्र त्यालादेखील नागरिकांचा विरोध आहे.
पेटीट रुग्णालयाचा विस्तारही रखडला
वसई पश्चिमेला पालिकेचे सर डी. एम. पेटीट हे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा विस्तार करून शेजारी २०० खाटांचे रुग्णालय बांधले जाणार आहे. २०२१ मध्ये या कामाचा शुभारंभ झाला होता. मात्र या जागेवर पालिकेच्याच एका कर्मचार्याचे निवासस्थान असल्याने त्याने न्यायालयात आव्हान दिले आहे. या कर्मचाऱ्यांमुळे या रुग्णालायाच्या विस्तारित इमारतीचे काम रखडले आहे. याबाबत न्यायालयातून अथवा इतर कायदेशीर मार्गाने तोडगा काढला जाईल आणि रुग्णालय पुर्ण केले जाईल, असा विश्वास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला .

Story img Loader