कारवाई न होण्यासाठी भूमाफियांची नवी शक्कल
प्रसेनजीत इंगळे
विरार : वसई-विरार शहरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई होऊ नये यासाठी या बांधकामात रुग्णालये अथवा शाळा सुरू करण्याची नवी शक्कल भूमाफियांनी लढवली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका शहरातील अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावत आहे, तर काही बांधकामांवर कारवाई करत आहेत. यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावर तोडगा म्हणून आता या बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत इमारतीत रुग्णालये सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेकडून या बांधकामांना शास्ती लावत घरपट्टी दिली जाते. या घरपट्टीच्या आधारे पालिकेचा वैद्यकीय विभाग रुग्णालयांना परवानगी देत आहे. यामुळे धोकादायक बांधकामात रुग्णालय सुरू होत आहेत. विरार, नालासोपारा पूर्व ९० फुटी रस्त्यावर ओस्वाल नगरी परिसरात श्वेता रुग्णालय सुरू केले जात आहे. या रुग्णालयात ट्रामा सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असा फलक रुग्णालयाने लावला आहे. या रुग्णालयाने परवानगी मिळविण्यासाठी आपली कागदपत्रे महानगरपालिका वैद्यकीय विभागाकडे सादर केले आहेत. पण पालिकेने त्यास काही त्रुटी दाखवत परवानगी राखून ठेवली आहे.
सदरची इमारत अनधिकृत असून त्यात पालिकेची कोणतीही परवानगी नाही. तसेच रुग्णालये सुरू करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने पालिकेकडे अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केला आहे. पण अग्निशमन विभागाने दाखला राखून ठेवला आहे. असे असतानाही रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हे रुग्णालय सुरू केले जाणार असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे. नुकतेच ‘लोकसत्ता’ने उघड केलेल्या तोतया डॉक्टर सुनील वाडकर याचे नोबेल रुग्णालयसुद्धा अशाच अनधिकृत बांधकामात होते. त्याचप्रमाणे वसई-विरारमधील पेल्हार, कामण, बोळींज, खानिवडे, धानीव, माणिकपूर, कळंब, जूचंद्र, नालासोपारा, संतोषभुवन, मनवेल पाडा, चंदनसार अशा ठिकाणी अनधिकृत बांधकामांत रुग्णालये बिनदिक्कतपणे सुरू आहेत आणि नव्याने सुरू होत आहेत. विशेष म्हणजे त्यात काही अतिदक्षता विभाग असलेल्या रुग्णालयाचासुद्धा समावेश आहे. सदरच्या रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेचे सारेच नियम धाब्यावर बसविले जातात. त्यांच्या जीवालाही धोका संभवतो.
अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला सादर केला नव्हता म्हणून रुग्णालयाला परवानगी दिली नाही, घरपट्टी दिली आहे अशा बांधकामात रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिली जाते. याबाबत तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे याच्या काळात निर्णय घेतला गेला होता.
– डॉ. भक्ती चौधरी, वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका.
या रुग्णालयाचा ना हरकत दाखल्यासाठी अर्ज आला आहे. या संदर्भात आमच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. पण अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. यामुळे ना हरकत दाखला राखून ठेवला आहे.
– दिलीप पालव, मुख्य अग्निशमन अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका