प्रसेनजीत इंगळे
विरार : पालिका आणि जिल्हा परिषद यांच्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र हस्तांतरण प्रक्रियेत कोणताही तोडगा निघाला नसल्याने मागील सात वर्षांपासून शहरातील रुग्णालये रखडली आहेत.
वसई, विरार शहरात जिल्हा परिषदेची ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३२ आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यातील ४ केंद्रे आणि ३२ उपकेंद्रे हे महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी राज्य शासनाने दर्शवली होती. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने हस्तांतरण प्रक्रियेला परवानगी देत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आपापसात बैठक घेऊन परस्पर निर्णय घेण्याचे सांगितले होते. २०१५ मध्ये महानगरपालिकेने हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण दोनही संस्था एकमेकांच्या अटी-शर्तीवर ठाम असल्याने ही प्रक्रिया आजतागायत पूर्ण होऊ शकली नाही. यानंतर पालिका आणि महापालिका यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी बैठक घेतली होती. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे रुग्णांना मुंबई अथवा उपनगरातील रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहेत. दुसरीकडे खासगी रुग्णालयांनी दर वाढवून रुग्णाची लूट चालवली आहे.
पेच काय?
जिल्हा परिषदेने या केंद्रांचे आणि उपकेंद्रांचे मूल्यांकन करून त्याचे बाजारभावाने पैसे द्यावे अशी अट ठेवली आहे. तर पालिका जिल्हा परिषदकडे हे केंद्र नि:शुल्क मागत आहे. दोघेही आपल्या भूमिकांवर ठाम आहेत.नवघर, नालासोपारा, चंदनसार, निर्मळ ही प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि त्याच्या अंतर्गत येणारी उपकेंद्रे महापालिकेकडे देण्यात आली आहेत तर आगाशी, कामण, पारोळ, भाताणे ही आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेकडेच राहणार आहेत. ही केंद्रे ३० वर्षांहून अधिक काळापासून आणि जर्जर अवस्थेत आहेत. दुसरीकडे पालिका नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शोधात आहे. पण दोघेही एकमेकांना सोयीच्या गोष्टी करण्यासाठी तयार नाहीत.
इमारती मोडकळीस
जिल्हा परिषद आरोग्य केंद्राच्या इमारती या ५० वर्षांहून अधिक काळ झाल्याने जुन्या होऊन मोडकळीस आल्या आहेत. बहुतांश केंद्रे खाडीलगत आणि दलदलीच्या भागात आहे. सर्व केंद्रांमध्ये १६ डॉक्टर कार्यरत आहेत. तर ४८ परिचारिका आहेत, ६ तंत्रज्ञ आहेत, ६ फार्मसिस्ट आहोत. सोपारा आणि अगाशी येथे तंत्रज्ञ नाहीत. तर नवघर आणि सोपारा येथील केंद्रात फार्मसिस्ट नाहीत. शिपायांची ७५ टक्के पदे देखील रिकामी आहेत.
जिल्हा परिषद पालिकेकडे प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे हस्तांतरित करण्यासाठी तयार आहे. हस्तांतरित केलेल्या केंद्रांचा मोबदला द्यावा. -दयानंद सूर्यवंशी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, पालघर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा