मागील आठवड्यात दोन घटना घडल्या. टपाल खात्याकडे आलेली पत आलेली शेकडो पत्र, आधार कार्ड आणि महत्वाचे कागदपत्रे नागरिकांना न वितरिक करता ती एका टाकून देण्यात आली होती. तर विरार मध्ये एका शिक्षिकेच्या घरात लागेलल्या आगीत १२ वीच्या गुणपत्रिका जळून राख झाल्या होत्या. दोन्ही प्रकऱणात कारवाई झालेली आहे. पण हा केवळ निष्काळजीपणा नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्वाच्या असलेल्या बाबींचा कसा विचका केला जातो त्याचे उदाहरण आहे. या केवळ दोन घटना समोर आल्या. परंतु आसपास पाहिले सर्वच सरकारी यंत्रणेत विविध प्रकारचा अक्षम्य निष्काळजीपणा करण्यात येत असतो आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात
१० आणि १२ या परिक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांच्या उत्तरपत्रिका खूप महत्वाच्या असतात. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वाणिज्य शाखेच्या संघटन व व्यवस्थानप (ओसी) या विषयाच्या उत्तरपत्रिका विरारच्या उत्कर्ष विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. प्रिया रॉड्रीक्स ही शिक्षिका विरारच्या उत्कर्ष विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकवते.
तिच्याकडे १२वी वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम आले होते. त्यातील १७५ आणि १२५ उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळेच्या शिक्षिका आणि परिक्षक नियामक प्रिया रॉड्रीक्स यांच्याकडे तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. उत्तरपत्रिका तपासणे, ते हाताळणे हे अत्यंत जबाबदारीचे काम असते. ते शाळेतच करावे लागते. मात्र प्रिया रॉड्रीक्स २५ फेब्रुवारी रोजी या उत्तरपत्रिका आपल्या घरी घेऊन आली. बरं ते तपासून लगेच केंद्रात जमा देखील केल्या नाहीत. १४ दिवसांनी म्हणजे १० मार्च रोजी तिच्या घराला आग लागली.
आग छोटी होती ती लवकर विझली. पण तिने उत्तरपत्रिका घरातील दिवाणखान्यातील सोफ्यावर सहज हाती लागतील अशा पध्दतीने ठेवल्या होत्या. परिणमी आगीत १७० उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून राख झाला. प्राथमिक चौकशीत प्राचार्या मुग्धा लेले आणि शाळेच्या शिक्षिका (नियामक) प्रिया रॉड्रीक्स यांनी नियमांचा भंग करून उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी दिल्याचे आढळून आले. त्यानुसार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्या उत्तरपत्रिका आग लागण्याच्या आधीच तपासल्याचा दावा केला जात आहे.
विद्यार्थ्यांनी काळजी करू नये वगैरे खुद्द शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. शिक्षणमंत्रीच म्हणत आहेत तर विश्वास ठेवूया. तपासल्या होत्या तर मग जमा का केल्या नाहीत. १४ दिवस तिच्या घरात का होत्या? असे अनेक प्रश्न आहेत. आग लागली म्हणून हा प्रकार उघडकीस आला. याचा अर्थ सर्वत्र आणि सहज असे प्रकार होत असतील. उत्तरपत्रिका तपासायला शिक्षक आपल्या घरी नेत असतील. मग अनेक गैरप्रकार देखील होत असल्याची शक्यता आहे. यात भरडले जाणार ते जीव तोडून अभ्यास करणारे सर्वसामान्य विद्यार्थीच…
दुसरी घटना अशीच गंभीर आहे. विरार पश्चिमेला टेंभी-कोल्हापुर ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत हद्दीजवळ असलेल्या कचराभूमीजवळ एक नाला आहे. स्थानिकांना तेथील नाल्यात काही कागदपत्रे दिसली. ती काही रद्दी कागदपत्रे नव्हती. त्यात होती नवीन आधारकार्ड, नोकरी संदर्भातील नियुक्ती पत्र, विम्याचे कागदपत्रे आदीं महत्वाचे दस्तावेज. विशेष म्हणजे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी वितरीत केलेले एका नागरीकाचे नवीन आधारकार्डाचा देखील त्यात समावेश होता. ही कागदपत्रे टपाल खात्यात आली होती.
टपाल खात्याने ती जबाबदारीने संबंधित नागरिकांना वितरीत करणे आवश्यक होती. मग ती नाल्यात आलीच कशी? याच्या चौकशीत जे समोर आलं ते धक्कादायक होतं. त्या डाक सेवकाने ही पत्र कागदपत्रे वितरीत करायची होती त्याने बदली म्हणून एका खासगी महिलेला हे काम दिले. तिने ते काम अतुल कांबळे या आपल्या भावाला दिलं. त्याने या पत्रांचं वितरण न करता बेजबाबदारपणे सर्व गठ्ठे नाल्यात टाकून दिले. त्यात आधार कार्डसारखे महत्वाचा दस्तावेज, नोकरीचे नियुक्तीपत्र, विम्याची कागदे होती तरी देखील त्याने त्याची पर्वा न करता फेकून दिलं. आता याप्रकरणी पोस्टमास्तर, डाकसेवकासह तिघांना निलंबित करण्यात आलं आहे.
पण यामुळे झालेले नुकसान कसं भरून काढणार?
डाक सेवक जेव्हा गैरहजर असतो तेव्हा बदली व्यक्तीला काम देता येते. मात्र त्याचे निकष असतात. त्याचे पालन केले जात नाही. हा प्रकार सर्रास होत असणार. लोकांना वेळेत पत्र, कागदपत्रे मिळत नसतील. ते टपाल खात्याला दोष देत असतील. अनेकांचं नुकसान झालेलं असेल.
‘काही होत नाही’ ही वृत्ती घातक
पेपर तपासायला घऱी आणले.. काही होत नाही, खासगी माणसाला टपाल वाटायला दिले.. काही होत नाही अशी जी वृत्ती आहे ती खूप घातक आहे. बेफिकरीपणा, निष्काळजीपणा दाखवणारी ही सर्वच ठिकाणी पहायला मिळते. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूकीसाठी कडक नियम आहे. मात्र रिक्षा, व्हॅन मध्ये विद्यार्थ्यांना कोंबून बसवतात. त्यांना वाटतं काही होत नाही.
अग्निसुरक्षा महत्वाची असते. नियमित त्याची चाचणी करणे गरजेचे असते. पण लोकांना वाटतं की काही होत नाही. मग मोठी दुर्घटना घडल्यावर जाग येते. निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत असतो. विविध शासकीय यंत्रणांमधील असा निष्काळजीपणा, लोकांना गृहीत धरण्याची वृत्ती सर्रास दिसून येते. रस्त्यावर उघडी गटारे असतील त्याला झाकणे न लावणे, धोकादायक वीज मीटर बॉक्स उघडे ठेवणे, पथदिवे बंद ठेवणे, धोकादायक फलक न काढणे अशी असंख्य असंख्य उदाहरणे आहेत. त्याचा फटका शेवटी सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असतो. सर्वांनीच छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता जबाबदारीने काम केलं तर हे धोके आणि नुकसान टळू शकेल.