वसई: वसई वरून वेलंकनी यात्रेला जाणारे वसईतील शेकडो भाविक मागील दहा तासापासून वसई रोड स्थानकामध्ये खोळंबून आहेत. वेलंकनीला जाणारी हमसफर एक्स्प्रेस पूरपरिस्थितीमुळे बडोदा स्थानकात थांबविण्यात आली आहे. ट्रेनच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. परवापासून वेलंकनी यात्रा सुरू होत आहे. वसईतुन या यात्रेसाठी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव जात असतात. यासाठी हमसफर एक्स्प्रेस ही साप्ताहिक ट्रेन सोडण्यात येते. मंगळवारी दुपारी २ वाजता ही ट्रेन वसई रोड स्थानकातून सुटणार होती.
हेही वाचा >>> वसई: भामट्यांनी डॉक्टर बनून महिलांना घातला गंडा, आशा सेविकांकडून घेतली माहिती
ही ट्रेन वसई-कल्याण मार्गे वेलंकनीला जाते.यासाठी तीनशेहून अधिक भाविक वसई रोड स्थानकामध्ये ट्रेनची वाट बघत उभे होते. मात्र गुजरात मध्ये आलेल्या पुरामुळे बडोदा रेल्वे स्थानकात ही एक्सप्रेस थांबून ठेवण्यात आली आहे. रात्री ते साडेदहा वाजून गेले तरी ही ट्रेन आलेली नाही. ट्रेनची वाट बघत भाविक वसई रोड स्थानकात खोळंबून उभे आहेत. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल होत आहे.
ट्रेन कधी येणार याबाबत रेल्वे कडून कुठेही उद्घोषणा होत नसल्यामुळे भाविकांमध्ये संताप पसरला आहे. आम्हाला पर्यायी ट्रेनची व्यवस्था करून द्या अशी मागणी संतप्त भाविकांनी स्टेशन मास्तर कडे गेली आहे. वेलंकनीसाठी बांद्राहून विशेष ट्रेन सोडवण्यात आली आहे. या ट्रेनला दोन बोगी चढून आमची व्यवस्था करा अशी मागणी प्रवासांनी केली आहे मात्र ती पूर्ण करण्यात आलेली नाही. रेल्वे कुठल्याही प्रकारची उद्घोषणा करत नव्हती आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा आम्हाला ट्रेन थोड्या वेळाने असेच उत्तर देण्यात आली होते. मात्र ही ट्रेन अद्यापही बडोदा स्थानकातच आहे, असे गॉडसन रॉड्रिक्स या प्रवाशाने सांगितले.