लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : घटनास्थळावरून तात्काळ न्यायवैद्यक पुरावे गोळा करण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्लालयाने आपल्या ताफ्यात आय बाईक (न्यायवैद्यक पथक) आणले आहे. शास्त्रोक्त पध्दतीने पुरावे गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतलेले पोलीस कर्मचारी या पथकात असतील. आयुक्तालयातील ३ परिमंडळासाठी प्रत्येकी एक आय-बाईक देण्यात आली आहे.

गुन्हा उघडकीस आला तरी आरोपीला दोषी सिध्द करण्यासाठी भक्कम पुराव्याची आवश्यकता असते. त्यासाठी विनाविलंब पुरावे गोळा करावे लागतात. न्यायालयात तांत्रिक पुराव्यांसोबत न्यायवैद्यक पुरावे महत्वाचे ठरतात. त्यामुळे घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने कौशल्यपूर्वक भौतिक पुरावे गोळा करणे आवश्यक असतात. परंतु विलंबामुळे असे पुरावे अनेकदा मिळत नाही. त्याचा फायदा आरोपीला मिळतो. यासाठी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाने फिरते न्यायवैद्यक पथक तयार केले आहे. त्यांना ‘आय बाईक’ असे नाव देण्यात आले आहे. परिमंडळ ३ मध्ये या आय बाईक चा शुभारंभ पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या हस्ते करण्यात आला.

नवीन कायद्याचे अंमलबजावणीसाठी ७ वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षा असणार्‍या गुन्ह्यांच्या ठिकाणी न्यायवैद्यक पथक बंधनकारक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कौशल्यपूर्वक भौतिक पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये आय-बाईकची स्थापना करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी सांगितले. न्यावैद्यक (फॉरेन्सीक) आय-बाईक कार्यान्वीत झाल्याने आयुक्तालयात दाखल होणार्‍या गंभीर गुन्हयांच्या घटनास्थळावरुन न्यायवैद्यक पुरावे गोळा करुन न्यायालयास शास्त्रोक्त पध्दतीने मांडणी होईल आणि गुन्हयाचे दोषसिध्दीचे प्रमाण वाढेल असा विश्वास पांडेय यांनी व्यक्त केला.

अशी आहे ‘आय-बाईक’

घटनास्थळावरील न्यायवैद्यक (फॉरेन्सीक) पध्दतीने दुवे, पुरावे गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलीस अंमलदारांची नेमणुक करण्यात आली आहे. आयुक्तालयातील तीन परिमंडळाकरीता प्रत्येकी एक आय-बाईक व न्यायवैद्यक (फॉरिन्सीक किट) देण्यात आली आहे. सदर आय-वाईक ही मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयातील प्रत्येक परिमंडळा करीता नेमण्यात आल्या असून त्यावर दिवस-रात्र प्रशिक्षित अंमलदार नेमण्यात आले आहेत.

सदोष मनुष्यवध शाखा

गुन्ह्यांची उकल केल्यानंतर आरोपीविरोधात पुरावे जमा करून न्यायालयात दोषारोपत्र (चार्जशिट) दाखल केले जाते. पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे न्यायालयात गुन्हा सिध्द करावा लागतो. मात्र अनेक प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने आरोपीला फायदा व्हायचा आणि तो पुराव्याअभावी निर्दोष सुटायचा. एकही आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत पोलीस तत्कालीन आयुक्त सदानंद दाते यांनी २०२१ मध्ये सदोष मनुष्यवध शाखा सुरू केली होती. ही शाखा देशातील एकमेव शाखा आहे. प्रत्येक गंभीर गुन्ह्यात सदोष मनुष्यवध शाखेने तांत्रिक, न्यायवैद्यक, जैविक पुरावे गोळा करण्याचे काम केले जाते. त्यासाठी या शाखेतील कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. न्यायालयातून पुराव्या अभावी सुटलेल्या १० प्रकरणांचा अभ्यास दरवर्षी करून त्यातील त्रुटी तपासल्या जातात. आय बाईक चा सदोष मनुष्यवध शाखेला मोठा फायदा होणार आहे.