लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नवीन वर्सोवा पूल तयार होताच जुन्या वर्सोवा पुलावर डागडुजी व खड्डे दुरुस्तीकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना जुन्या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा विविध विभागांना जोडणारा महत्वाचा मार्ग असल्याने दररोज येथून मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ होत असते. याच मार्गावरील भाईंदर खाडीवर वर्सोवा पूल तयार करण्यात आला आहे.मात्र पूल अनेक वर्षे जुना झाल्याने व वाहतुक कोंडीची समस्या लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याच्या बाजूलाच नवीन वर्सोवा पुलाची निर्मिती करून तो वाहतुकीसाठी खुला केला आहे.
आणखी वाचा-विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक
पूल खुला झाल्यानंतर मुंबई गुजरात या दिशेने होणारी वाहतूक ही नवीन पुलावर वळविण्यात आली. तर दोन्ही जुन्या वर्सोवा पुलाच्या मार्गिका ही ठाणे या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आला आहे. परंतु या जुन्या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या पुलावर विविध मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तर काही वेळा खड्ड्यामुळे अवजड वाहने ही मध्येच बंद पडतात अशा वेळी तर अधिकच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.
जुन्या पुलावर पावसामुळे दुरुस्तीसाठी अडचणी येत होत्या. आता पाऊस थांबेल तेव्हा त्यावर टाकलेले मटेरील काढून नव्याने त्यावर लेयर मारून पुलावरील भाग दुरुस्त केला जाईल. -सुहास चिटणीस, व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
आणखी वाचा-कचरा विल्हेवाट प्रक्रियेला वेग; पालिकेकडून सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
नवीन पुलामुळे जुन्या पुलाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
नवीन पूल तयार झाल्यानंतर जुन्या पुलावरील खड्डे बुजविणे, त्याची डागडुजी करणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खड्ड्यांमुळे छोट्या वाहनांचे ही नुकसान होत आहे. आज अनेक वाहनचालकांना याचा फटका बसतो. यासाठी आता तरी प्राधिकरणाने जागे होऊन पुलावरील खड्डे बुजवून रस्त्या सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ( शिंदे गट) नायगाव पूर्वचे विभाग प्रमुख सागर पाटील यांनी केली आहे.
सर्वाधिक अवजड वाहने ठाण्याच्या दिशेने
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग मुंबई गुजरात यांना जोडणारा महत्वाचा मार्ग असला तरीही वर्सोवा पुला जवळून अनेक वाहने ही ठाण्याच्या दिशेने जाणारी आहेत. कल्याण, भिवंडी, नवी मुंबई अशा ठिकाणी जाणारी सर्वाधिक अवजड मालवाहतूक वाहने ही याच जुन्या पुलावरून जात आहेत. असे असताना ही पुलावरील रस्ता सुरळीत केला जात नाही.