वसई : वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई सुरू असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपाऱ्यातील होमिओपॅथिक डॉक्टर शशीबाला शुक्ला या दवाखान्यात बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळय़ा देत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने ‘स्टींग ऑपरेशन’ करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात डॉ. शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू आहे.
शहरातील अनेक तरुणींना गर्भपातानंतर वैद्यकीय समस्या उद्भवू लागल्या होत्या. त्यांना चुकीच्या पद्धतीने गर्भपाताच्या गोळय़ा दिल्या जात असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पालिकेने बेकायदा गर्भपात केंद्र चालविणाऱ्या डॉक्टरांचा शोध सुरू केला होता. नालासोपारा पूर्वेच्या विजयनगरमध्ये डॉ. शशीबाला शुक्ला यांचे ‘आशीर्वाद क्लिनिक’ आहे. डॉ. शुक्ला या होमिओपॅथिक पदविकाधारक (डीएचएमएस) असतानाही अॅलोपॅथीची सेवा देत होत्या. याशिवाय त्या दवाखान्यात बेकायदेशीरित्या तरुणींना तपासून गोळय़ा देत होत्या, अशी माहिती मिळाली होती. त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी पालिकेने काही दिवसांपासून सापळा लावला होता. मंगळवारी दुपारी पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख उपायुक्त डॉ. विजयकुमार द्वासे आणि डॉ. भक्ती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंडितराव राठोड, डॉ. अनाया देव, डॉ. कृपाली फर्डे, मनोज यादव यांनी ‘स्टींग ऑपरेशन’ केले.
डॉ. शुक्ला यांच्याकडे एक बनावट रुग्ण पाठवण्यात आला. डॉ. शुक्ला यांनी सोनोग्राफी न करता त्यांना गर्भपाताच्या गोळय़ा दिल्या असता त्यांना रंगेहाथ पथकाने पकडले. या वेळी त्यांच्याकडे गर्भपाताच्या अनेक गोळय़ा व अॅलोपॅथीची औषधे सापडली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानुसार तुळींज पोलीस ठाण्यात कलम ४२० , बेकायदा गर्भपात अधिनियम, औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसादन तसेच वैद्यकीय गर्भ समाप्ती अधिनियम २००३ च्या कलम ३ अन्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक वर्ष गैरप्रकार?
डॉ. शुक्ला या होमिओपॅथिक डॉक्टर असून, त्यांना अॅलोपॅथीची औषधे देता येत नाही. गर्भपाताच्या गोळय़ा फक्त एमबीबीएस स्त्रीरोग तज्ज्ञ देऊ शकतो. डॉ. शुक्ला यांच्याकडे या संदर्भातील कुठलाही शैक्षणिक पात्रता नसतानाही त्या बेकायदेशीरपणे रुग्णांना गर्भपाताच्या गोळय़ा देत होत्या. त्या अॅलोपॅथीच्या प्रॅक्टीसही करत होत्या. अशा प्रकारे गोळय़ा देणे रुग्णांच्या जीवावर बेतू शकते, अशी माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली. मागील ३५ वर्षे त्या दवाखाना चालवत आहे. त्यामुळे हा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.