विरार : वसई, विरारमध्ये वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे अनेक खासगी कंपन्यांनी इंटरनेटची सेवा  सुरू केली आहे. ब्रॉडबँड इंटरनेट सेवेसाठी या कंपन्या वाटेल तशा पद्धतीने इंटरनेटच्या तारा (केबल) टाकत आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.  तारांना कोणताही मुख्य आधार नसल्याने त्या तुटूनअपघात होण्याची शक्यता वाढली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई, विरार परिसरात करोना काळापासून घरून काम  आणि ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने  घराघरात इंटरनेटची मागणी वाढली. त्यातून खासगी कंपन्यांनी ग्राहक मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्या. यामुळे घराघरात इंटरनेट सेवा देण्यासाठी कंपन्यांनी अनेक युक्त्या सुरू केल्या त्यात तातडीने  जोडणी करण्यासाठी जागा मिळेत तेथून या कंपन्यांनी आपल्या इंटरनेटच्या तारा खेचण्यास सुरूवात केली आहे.  यात रस्त्यावरील झाडे, विजेचे खांब, इमारतीच्या गच्चीवरून या तारा खेचल्या जात आहेत. त्यात बाजारात अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने ग्राहक सातत्याने सोयीच्या आणि स्वस्तात सेवा देण्याऱ्या कंपन्याकडे स्थलांतरित होत असल्याने नवनवीन जोडणींसाठी पुन्हा तारांचे जाळे निर्माण होऊ लागले आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी हे बेकायदा तारांचे जाळे उभे राहत आहे.

या कंपन्या तारा पसरविताना कोणत्याही परवानग्या घेत नाहीत. इंटरनेट सेवा आवश्यक असल्याने त्यांना सहसा कोणी विरोध करत नाहीत. यामुळे या इंटरनेटधारक कंपन्या आपली वैयक्तिक मालमत्ता समजत तारा टाकण्याचे काम करत आहेत. यात प्रामुख्याने झाडांवर  तारा आणि त्यांचे प्रवाहक डबे, खीळे ठोकून अथवा तारेने बांधले जातात. यामुळे झाडांना इजा होत आहे. त्याच बरोबर मुख्य रस्त्यावरील विजेचे खांब, महापालिकेचे पथदिवे यांवर या तारा टाकून खेचल्या जातात.  विजेच्या खांबाला या तारांचा विळखा असल्याने अनेक वेळा आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या तारांवर पक्षी बसत असतात.  लोंबत्या तारा अनेक वेळा मोठय़ा वाहनांत अडकून त्या तूटत आहेत.  यामुळे  अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या इंटरनेट सेवा देणाऱ्या  कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.