वसई– हवामान विभागामार्फत पालघर जिल्ह्यासह वसई विरार मध्ये शनिवार २२ जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या काळात सर्व शैक्षणिक आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वसई विरार शहरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने शनिवारी देखील वसई विरार मध्ये रे़ड ॲलर्टचा इशारा दिला आहे. यामुळे महानगरपालिकेमार्फत अतिवृष्टीच्या वेळी उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत मुसळधार पाऊस पडून सखल भागात पाणी साचणे, पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होणे, झाडे उन्मळून पडणे, विद्युत खांब पडणे इत्यादीं मुळे काही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक काम असल्याशिवाय कृपया नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.
हेही वाचा >>> वसईत एसबीआय बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न; अलार्म वाजला आणि चोर पळाले
पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
शनिवारी रेड अलर्टचा इशारा असल्यामुळे शनिवार २२ जुलै रोजी देखील वसई विरारसह पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकार्यांनी सु्ट्टी जाहीर केली आहे. सलग तिसर्या दिवशी चौथ्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना शनिवार २२ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.