वसई- १२ वी परिक्षा देण्यासाठी आलेल्या एका तोतया ‘विद्यार्थ्याला’ पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे. अहमद खान असे या तोतया विद्यार्थ्याचे नाव आहे. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील एका परिक्षा केंद्रात हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्या अरबाझ कुरेशी या विद्यार्थ्यासाठी तो परिक्षा देण्यासाठी आला होता तो राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा अंबरनाथशहर प्रमुख आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता. अंबरनाथ शहरातील काही तोतया विद्यार्थी नालासोपारा येथील परिक्षा केंद्रावर परिक्षा देण्यासाठी येत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी त्यांनी संशयित विद्यार्थ्याचा पाठलाग केला. हा विद्यार्थी पेल्हार येथील ओम साई छाया ज्युनिअर कॉलेज मधील परिक्षा केंद्रावर आला. कार्यकर्त्यांनी त्याची माहिती परिक्षा केंद्र प्रमुखांना दिली. हा तरुण तोतया असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नाव अहमद खान असून तो अरबाझ कुरेशी या विद्यार्थ्यांचा पेपर सोडविण्यासाठी आला होता. याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अहमद खान याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप राख यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पदाधिकारी

अरबाझ खान हा मूळ विद्यार्थी अंबरनाथ येथील आहे. विशेष म्हणजे तो अंबरनाथ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे. अनेक तरुण अशाप्रकारे तोतया विद्यार्थी बनून परिक्षा देण्यासाठी आली आहेत असा आरोप मनसेने केला आहे. आमच्या हाती एक तरुण लागला बाकी दोन जणांनी पळ काढला अशी माहिती मनसेच्या नालासोपारा येथील सागर कुरडे यांनी दिली.