वसई: वसई भाईंदर रोरो सेवेला एक वर्ष पूर्ण झाले असून गेल्या वर्षभरात या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या रोरो सेवेतून दीड लाखाहून अधिक प्रवाशांची वाहतूक व ९७ हजार ५०० इतक्या विविध प्रकारच्या वाहनांची वाहतूक करण्यात आली आहे.

वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे  फेब्रुवारी २०२४ पासून वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरूकरण्यात आली आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस प्रा. लि. यांच्या मार्फत ही चालविली जात असून या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी आहे.

लोकल गाडी मधील वाढती गर्दी, महामार्गावरील वाहतूक कोंडी अशा विविध प्रकारच्या कारणामुळे वसई भाईंदर बहुतांश प्रवासी हे रोरो सेवेने प्रवास करू लागले आहेत. दिवसेंदिवस रोरो ने प्रवास करणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. रोरो सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांचा वेळ व इंधन याची बचत होत असल्याने वसई भाईंदर असा प्रवास करणाऱ्यांवर नागरिक भर देऊ लागले आहेत.

मागील वर्षभरात या रोरो सेवेतून ६१ हजार ५५५ दुचाकी, ५ हजार ३०५ रिक्षा, २८ हजार ७१२ कार, १ हजार २९ छोटा टेम्पो, अवजड वाहने ३४६, सायकल ५८१ अशा एकूण९७ हजार ५२८ वाहनांची वाहतूक झाली आहे. तर दुसरीकडे १ लाख ४२ हजार ८६२ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर दोनशेहून अधिक श्वान, गाय, शेळ्या अशा जनावरांची वाहतूक करण्यात आली आहेअसल्याची माहिती रोरो सेवा व्यवस्थापक यांनी दिली आहे.
रोरो सेवेमुळे पटकन भाईंदर व मुंबई गाठता येते यामुळे ही रोरो सेवा अधिकच सोयीस्कर ठरत आहे अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.

रोरोच्या फेऱ्या वाढल्याने फायदा

सुरवातीला केवळ एकच रोरो बोट होती त्यामुळे प्रवाशांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर बोट गेली का ताटकळत थांबावे लागत होते.यासाठी नवीन आणखीन एक बोट रुजू करून दोन बोटीद्वारे सेवा दिली जात आहे. ९ ऐवजी आता दैनंदिन १५ फेऱ्या चालविल्या जात आहेत. त्यामुळे ताटकळत राहत असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विरार- जलसार रोरो सेवा ही लवकरच सुरू होणार

सागरी मार्गाने ही दळणवळण सुविधा सुलभ व्हावी यासाठी रोरो सेवा सुरू करण्यावर सागरी मंडळाने भर दिला आहे. वसई भाईंदर पाठोपाठ आता विरार ते जलसार अशी रोरो सेवा ही लवकरच सुरू केली जाणार आहे. रो रो सेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी जवळपास पूर्ण होत आल्या असून ही सेवा सुरू होण्यासाठीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.खारवाडेश्री जलसार ते नारंगी हे रस्त्याचे अंतर ६० किलोमीटरचे असून सर्वसाधारणपणे या प्रवासासाठी दीड तास लागतो. मात्र जलमार्गाने हाच प्रवास १५ ते २० मिनिटे इतका होणारे आहे. पालघर व वसई मधील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Story img Loader