भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेने जैव इंधन प्रकल्पातील खड्डयात ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मिरा रोडच्या पेणकर पाडा येथे ही दुर्घटना घडली होती. काशिमिरा येथील पेणकर पाड्यात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. श्रीयांश मोनू सोनी (५) हा मुलगा पेणकर पाडा येथील शिवशक्ती नगरमध्ये पालकांसोबत राहात होता. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तो इतर मुलांसोबत खेळायला गेला होता. मात्र बराच वेळ घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. यावेळी मैदानाच्या बाजूला जैव इंधन प्रकल्पासाठी पालिकेने खणलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह आढळला. पाण्यात खेळताना बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालिकेविरोधात मोठा संताप पसरला होता. जो पर्यतं संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका मुलाच्या नातेवाईकांनी घेतली होती.
तीन वर्षांपूर्वी मिरा भाईंदर महापालिकेने पेणकर पाडा परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जैवइंधन (बायोगॅस) प्रकल्प उभारण्याचा निर्णय ङेतला होता. एक वर्षांपूर्वी कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. मात्र हे काम संथ गतीने सुरू होते. कंत्राटदाराने आता पर्यंत केवळ मोठा खणला होता. माझा एकुलता-एक मुलगा खेळण्यासाठी गेला होता. मात्र महापालिकेने कोणतीही सुरक्षा न बाळगता खोदलेल्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याचे मयत मुलाचे वडील मोनू सोनी यांनी सांगितले.
हेही वाचा : शहरबात : ही वसई आमची नाही…
या दुर्घटनेनंतर शनिवारी काशिमिरा पोलिसांनी संबंधित ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खड्ड्याध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्याला सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नव्हत्या. महापालिकेच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. या प्रकरणी संबंधित विभाग प्रमुखांकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर यांनी सांगितले.