भाईंदर : काशिमीरा पोलीस ठाण्यात उभारण्यात आलेल्या महिला व बाल तक्रार कक्षात पाच महिन्यांत ८३ तक्रारींची नोंद झाली आहे. यातील शंभर टक्के तक्रारदारांच्या समस्यांचे निवारण करण्यास यश मिळाले असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. अनेक वेळा विविध कारणांमुळे महिला तसेच लहान मुले तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असतात. मात्र पोलीस ठाण्यात असलेल्या गर्दीमुळे तसेच इतर लोकांच्या उपस्थितीमुळे त्यांना आपली मूळ तक्रार सांगण्यास अडचण भासत असते. त्यामुळे नाईलाजाने बऱ्याच वेळा आपल्या तक्रारीचे निवारण काढण्यात ते अपयशी ठरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा मुलांना आणि महिलांना पोलिसांपुढे मनमोकळेपणाने बोलता यावे, म्हणून पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोलीस ठाण्यात स्वतंत्र महिला व बाल तक्रार कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. याचे लोकार्पण पाच महिन्यांपूर्वी (२१ सप्टेंबर २०२३) पोलीस आयुक्त मधुकर पांडे याच्या हस्ते करण्यात आले. तर या कक्षाची जबाबदारी महिला पोलीस उप-निरीक्षक अर्चना जाधव यांच्यावर सोपवण्यात आली होती.

हेही वाचा : वसई भाईंदर दरम्यान प्रवास वेळेत ५५ मिनिटांची होणार बचत

त्यानुसार आतापर्यंत या कक्षात ८३ महिलांनी भेट दिली असल्याची नोंद झाली आहे. यात महिलांच्या समस्यांचे निवारण करण्यात यश आले असून आवश्यक प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया राबवली असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

हेही वाचा : भाईंदर: इमारतीच्या गच्चीवरून पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

हिरकणी कक्षाचा देखील वापर

कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर सोबत बाळ असेल तर त्याला दूध पाजता यावे, यासाठी शांत वातावरण मातेला मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार काशिमीरा पोलीस ठाणे हे अत्यंत रहदारी असलेल्या ठिकाणावर असल्यामुळे या ठिकाणी चाईल्ड हेल्प केअर सामाजिक संस्थेच्या मदतीने हरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे मागील पाच महिन्यांत या कक्षाचा देखील चांगल्या पद्धतीने वापर होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhaindar kashimira police station 83 complaints recorded in women and child complaints cell css