भाईंदर : मिरा रोड येथील शांती शॉपिंग सेंटर मधील एका दुकानदारावर गोळीबार करण्यात आला. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) याचा मृ्त्यू झाला. पूर्ववैमन्यसातून ही गोळीबाराची घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मिरा रोड पूर्वेला रेल्वे स्थानकाच्या बाहेर शांती शॉपिंग सेंटर आहे. येथे शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) याचे चष्म्याचे दुकान आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास दुकानात आलेल्या एका व्यक्तीसोबत त्याचा वाद सुरू होता. त्यावेळी आरोपीने थेट अन्सारीच्या डोक्यात गोळी घातली.
हेही वाचा : मुंबईत बदल्या झालेल्या पोलिसांना दिलासा; ७ पोलीस अधिकारी पुन्हा वसई, भाईंदरमध्ये
गोळीबाराच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. हल्लेखोर गोळीबार करून घटनास्थळावरून फरार झाला. नया नगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.हल्लेखोराने जवळून गोळी झाडल्याने अन्सारी याचा मृत्यू झाला आहे. आम्ही परिसराती सीसीटीव्ही तपासून हल्लेखोराचा शोध आहोत, अशी माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांनी दिली. मयत अन्सारी याचा येथील एका विक्रेत्यासोबत वाद होता. त्यातून ही गोळीबाराची घटना घडली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.