भाईंदर : अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्या घरात डोकावणार्‍या एका रोडरोमेयोला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. भाईंदर पोलिसांनी आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी मुलीच्या आईने घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता.

भाईंदर पश्चिमेला एक महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलींसह रहात होती. मागील दोन महिन्यापासून याच परिसरात राहणारा धीरज गोरे (२५) नावाचा एक इसम मुलींचा पाठलाग करत होता. महिला घरात नसताना घरात डोकवायचा. त्यामुळे मुलीना असुरक्षित वाटत होते. मुलीनी हा प्रकार आपल्या आईला सांगितला. तिच्या आईने स्थानिक मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. परंतु या गोष्टींचा पुरावा नव्हता. त्यामुळे या गोष्टीची खात्री पटावी म्हणून महिलेने आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यावेळी धीरज गोरे घरात डोकावत असल्याचा दिसून आला. मंगळवारी रात्रीच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि भाईंदर पोलीस ठाण्यात नेले.

हेही वाचा : भाईंदर मेट्रोला विलंब होणार ? काशिगाव स्थानाकाच्या जागेअभावी प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता

पोलिसांनी देखील महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर बालकांच्या लैगिक शोषण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपी हा खासगी रुग्णालयात कामाला असून याबाबत तपास सुरु असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.