भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रस्त्यालगत असलेले आई सगनाई देवीचे मंदिर स्थलांतरित करण्यास अखेर महापालिकेने सुरुवात केली आहे.यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाईंदर घोडबंदर रस्त्यावर आई सगनाई देवीचे जुने मंदिर आहे.हे मंदिर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात बाधित होत आहे. सध्या याच ठिकाणी रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असून वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. त्यामुळे हे मंदिर नवीन जागेत स्थलांतर करून महामार्गाचे रुंदीकरण करण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मिरा-भाईंदर महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार मंदिर याच समोरील नवीन जागेत स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव पालिकेने ग्रामस्थांपुढे ठेवला आहे.

यापूर्वी महापालिकेने उभारलेल्या जागेत मंदिर स्थलांतरित करण्यास ग्रामस्थांच्या विरोध असल्याने हे काम रखडले होते.मात्र आता वाढत्या वाहतूक कोंडीच्यासमस्यांचा विचार करता मंदिर त्वरित स्थलांतरीत करण्याचा ठाम निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता.याबाबत नुकतीच मंदिर समिती व ग्रामस्थांसोबत आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी बैठक घेतली होती.यामध्ये अखेर ग्रामस्थांनी संमती दिल्यामुळे मंगळवारी सकाळीच मंदिर स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले.यावेळी कोणताही वाद किंवा गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ तर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तर पुढील एक ते दोन दिवसात मंदिर स्थलांतरित करून मूर्तीची प्रतिष्ठापना करणार असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

“रस्त्याचे रुंदीकरण व इतर विकासकामे पूर्ण करण्यासाठी हे मंदिर जवळच स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्थलांतराचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी कोणताही वाद झालेला नसून प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे.”
संभाजी पानपट्टे – अतिरिक्त आयुक्त ( मीरा भाईंदर महानगरपालिका )

वाद संपुष्टात

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सगनाई देवीचे मंदिर स्थलांतरित करण्यावरून बऱ्याच वर्षापासून वाद सुरु आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे पालिका प्रशासनाने मंदिर व्यतिरिक्त इतर सर्व परिसर मोकळा करून रस्त्याचे रुंदीकरण करून घेतले होते.मात्र आता उड्डान पूल,भुयारी मार्ग व इतर वाहनाच्या रहदारी मार्गावर हे मंदिर अडचण ठरू लागल्यामुळे ठाम भूमिका घेऊन मंदिराच्या स्थलांतराचा निर्णय घेतला. विशेषतः संबंधित ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हे काम सुरू केल्याने प्रश्न मिटला आहे.