भाईंदर : मिरा भाईंदर शहराचे माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवाराला अद्यापही आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक गोंधळात सापडले आहेत. मिरा भाईंदर शहराच्या राजकारणात माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांचे एक विशेष स्थान आहे. मूळ ख्रिश्चन-कोळी समाजातून आलेल्या या स्थानिक नेत्याला आगरी तसेच अन्य समाजातील नागरिकांचे मोठे समर्थन आहे.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मेन्डोन्सा यांच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्याची शर्यत महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लागली आहे.
मेन्डोन्सा हे राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार असल्यामुळे त्यांचे पूर्वीपासून राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत. मात्र नाईक कुटुंबीयांशी असलेल्या नाराजीमुळे त्यांनी पक्ष सोडला होता.मधल्या काळात एका भूखंडातील गैरव्यवहारात त्यांना तुरुंगवास झाला असताना तत्कालीन शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनी मदत केली होती. त्यामुळे बाहेर येताच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता देखील मेन्डोन्सा हे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये असून आपल्याच बाजूने असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना आहे. तर मेन्डोन्सा हे शिंदेच्या बाजूने असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
हेही वाचा : मिरा भाईंदरमधील भाजपाचे नाराजी नाट्य संपुष्टात, नरेश म्हस्के यांच्या प्रचारात भाजप सक्रीय
आता दोन्ही पक्षाच्या उमेदवाराच्या प्रत्यक्ष प्रचार सभेला सुरुवात झालेली असताना देखील मेन्डोन्सा यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर न केल्यामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वीच आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीतर्फे मेन्डोन्सा यांची भेट घेऊन त्यांना जाहिर पाठींबा देण्याची विनंती केली होती.तर खासदार राजन विचारे देखील आधूनमधून मेन्डोन्साची भेट घेत असतात. त्यामुळे मेन्डोन्सा हे नेमके कोणाच्या बाजूने आहेत किंबहुना आपल्याला कोणासाठी प्रचार करायचा आहे,असा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकांपासून मेन्डोन्सा हे अंतर ठेवणार असून विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा : नालासोपार्यात पोलिसावर प्राणघातक हल्ला, पोलीस गंभीर जखमी
मिरा भाईंदर शहराच्या राजकारणात माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांचा मोठा प्रभाव आहे. ग्रामपंचायत काळापासून मेन्डोन्सा यांचे शहरावर वर्चस्व होते. ग्रामपंचायत ते महापालिकेच्या विविध पदांवर मेन्डोन्सा कुटुंबीयांनी प्रमुख पदे भूषवली होती. मात्र २०१४ मध्ये भाजप पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी विधानसभा निवडणुकीत मेन्डोन्सा यांना पराभूत केले होते. दरम्यान २०१६ साली घोडबंदर येथील एका जमिनीच्या प्रकरणात त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. त्यांचा वारसा चालविणारे कुटुंबातून कुणी सक्षम नसल्याने त्यांचे शहरातील महत्व हळूहळू कमी झाले. मात्र आजही मिरा भाईंदर शहरात मेन्डोन्सा यांचा दबदबा असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाईदरमधील ख्रिस्ती, कोळी मतदारांमध्ये त्याचे वजन असून त्यांच्याकडे असलेली मते निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात.