भाईंदर :-मिरा भाईंदर महापालिकेने आयोजित केलेल्या ‘माझी वसुंधरा महोत्सवात नियोजनाचा अभाव असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचा आरोप मनसेने केला आहे. भर उन्हात मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. रात्री त्यांना घरी जाण्याची सोय देखील उपलब्ध करून दिली नव्हती असा आरोप करण्यात आला आहे. पालिकेने हे आरोप फेटाळून लावताना महोत्सव यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

पंचतत्वावर आधारित असलेल्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत ‘माझी वसुंधरा २०२५’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी ४ ते ६ एप्रिल दरम्यान भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानावर वन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात ४ एप्रिल रोजी सायंकाळी संगीत संध्या कार्यक्रम,५ एप्रिल रोजी सकाळी चित्रकला स्पर्धा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ६ एप्रिल रोजी सकाळी भाईंदर पश्चिम येथील जंजिरे धारावी किल्ल्यापर्यंत ‘किल्ला सायक्लोथॉन ‘ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार मागील तीन दिवसापासून हा कार्यक्रम सुरु होता.

मात्र या कार्यक्रमाचे योग्य नियोजन प्रशासनाला आखता आले नसल्याचे आरोप केले जात आहेत.परिणामी याचा मोठा फटका हा कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थांना बसला. शनिवार ५ एप्रिल रोजी विद्यार्थांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही चित्रकला स्पर्धा भर उन्हात बसवून घेण्यात आली. रणरणत्या उन्हात लहान मुले चित्रे काढत होती. त्याचा अनेक लहान मुलांना त्रास झाला. रात्री संस्कृतीक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रात्री १० नंतर शिक्षकांच्या जबाबदारीवर घरी सोडण्यात आले होते.मात्र वाहतुकीसाठी कोणतेही वाहन उपलब्ध करून दिले नव्हते. परिणामी शिक्षकांनी एकाच रिक्षात बऱ्याच विद्यार्थांना कोंबून घरी पाठवले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाल्याची नोंद झाली नाही. परंतु कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने आयोजित केलेला कार्यक्रम केवळ नियोजना अभावी फसला असल्याचे आरोप मिरा भाईंदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत.

प्रशासकीय बदलाचा परिणाम

मिरा भाईंदर महापालिकेमार्फत सलग पाचव्या वर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र यावर्षी प्रशासनाकडून कार्यक्रमाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी कार्यक्रमाला अपेक्षे प्रमाणे प्रसिद्धी मिळाली नसून अनेक गंभीर चुका समोर आल्या आहेत.प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे हा घोळ झाल्याचे प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मागील सहा महिन्यात पालिकेत नवे आयुक्त व उपायुक्त बदल्यामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निर्माण झालेली पकड सैल झाली असून कोणतेही कार्यक्रम गांभीर्याने पूर्ण केले जात नसल्याचे आरोप केले जात आहेत.

कार्यक्रम यशस्वी झाल्याचा दावा

मिरा भाईंदर महापालिकेन माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित केलेला तीन दिवसीय कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झाला तसेच नागरिक मोठ्या उत्सहाने सहभागी झाल्याचे पालिकेने सांगितले. आता पर्यंत एकही गैरप्रकार घडला असल्याची कोणतीही तक्रार पुढे आलेली नाही. त्यामुळे एकार्थी कार्यक्रम यशस्वी झाला असल्याचा दावा पालिका अधिकार्‍यांनी केला आहे.