वसई: जादू टोण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढणाऱ्या विनोद पंडित नावाच्या ढोंगी बाबाला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. हस्तरेखातज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या या ढोंगी बाबा पंडितने अनेक महिलांना आपले शिकार बनवले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फेसबुकवर जाहिरात करून तो महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत असे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष पोतदार उर्फ विनोद पंडित (५५) नावाच्या या ढोंगी बाबाने फेसबुक वर हस्तरेखा तज्ञ विनोद पंडित या नावाने पेज सुरू केले होते. मीरा रोडच्या शांती नगर येथील मोहिनी अपार्टमेंट मध्ये त्याने आपले दुकान थाटले होते. काळी विद्या, जादूटोणा अवगत असल्याचा दावा त्याने केला होता. वैवाहिक अडचणी आणि विविध समस्या असल्यास पत्रिकेतील दोष दूर करून दिला जाईल असे या फेसबुक पेजवर त्याने म्हटले होते.

हेही वाचा : माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांची भूमिका अस्पष्टच, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

जोगेश्वरीत राहणाऱ्या एका महिलेला नोकरी लागत नव्हती. ती या बाबाची फेसबुक जाहिरात वाचून त्याच्याकडे गेली होती. बाबाने तिचा विश्वास संपादन केला आणि जादूटोणा तंत्र विधीच्या नावाखाली तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध बनवू लागला. नंतर या महिलेचे लग्न झाले. परंतु एका वर्षातच तिच्या लग्नातील वैवाहिक अडचणी आल्याने पुन्हा या बाबाची भेट घेतली. मात्र या बाबाने जादूटोणाच्या नावाखाली तिच्यावर नैसर्गिक तसेच अनैसर्गिक बलात्कार केला. या काळात बाबाने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून तो तिच्यावर बलात्कार करत होता. तीन वर्ष बाबा तिला धमकावून बलात्कार करत होता.

अखेर कंटाळून महिलेने नया नगर पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७६ (२) (एन), ३७७, ५०६ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम ६७ (बी) तसेच महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा उच्चाटन अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या ढोंगी बाबाला गुरुवार दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हेही वाचा : मिरा भाईंदरमधील भाजपाचे नाराजी नाट्य संपुष्टात, नरेश म्हस्के यांच्या प्रचारात भाजप सक्रीय

अनेक महिला बाबाच्या ‘जाळ्यात’

आरोपी पंडितच्या मोबाईल मध्ये आम्हाला तीन महिलांची अश्लील छायाचित्रे आढळली आहेत. त्याने अनेक महिलांना आपले शिकार बनवण्याची शक्यता नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल हक देसाई यांनी व्यक्त केली आहे. ज्या महिलांची ढोंगी बाबा पंडित याने फसवणूक केली असेल त्याने नया नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन नया नगर पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे विनोद पंडित या ढोंगी बाबा वर २०१९ मध्ये देखील नया नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mira bhaindar rape of woman in the name of witchcraft fake baba vinod pandit arrested css