ईद निमित्त रस्ता अडवून नमाज अदा करण्याची प्रथा यंदा मोडीत काढत मिरारोडच्या मुस्लिम बांधवानी नवा आदर्श ठेवला आहे. ईदची नमाज अदा करण्यासाठी सर्व मशीदीमध्ये दोन किंवा तीन भागात जमातीची सोय करण्यात आली आहे.
मिरा रोड येथे मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिक राहतात शहरात जवळपास दोनशेहुन अधिक मशीदी आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना पूर्ण झाला असून आज ईदचा सण आहे. त्यामुळे ईदची नमाज अदा करण्यासाठी मशीदीत एका ठराविक कालावधीत जमातची सोय केली जाते. ईद हा मुस्लिम समाजासाठी सर्वात मोठा सण असल्यामुळे यादिवशी प्रार्थना करणाऱ्या नागरिकांची संख्या ही दैनंदिन प्रार्थना करणाऱ्यांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असते. त्यामुळे मशीदच्यामध्ये खूप गर्दी होऊन नाईलाजाने बहुतांश नागरिक रस्त्यावरच बसून प्रार्थना करतात. मात्र यामुळे वाहतूक कोंडी सारखे प्रश्न उभे राहते आणि त्यावर टीका होत असते.
हेही वाचा… विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
त्यामुळे ही समस्या कायमची दूर करण्यासाठी मिरा रोड येथे राहणारे माजी आमदार मुजफर हुसेन यांच्या पुढाकाराने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यात सर्व मशीद मधील इमामाना(मशीद मधील धर्मगुरु )त्यांनी एकत्र आणून ईदसाठी असलेल्या जमाती मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ईदची प्रार्थना करण्यासाठी दोन ते तीन जमात मिळत असल्याने नागरिक देखील आपल्या सोयीने नमाज पठण करण्यासाठी मशीद मध्ये येऊ लागले आहेत. यामुळे एकाच वेळी मशीद मध्ये होणारी गर्दी कमी झाली असून रस्त्यावर बसून नमाज पठण करण्याची प्रथा देखील पूर्णतः मोडीत निघाली आहे. मुस्लिम बांधवानी उचललेल्या सकारात्मक पाऊलाचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live : पंतप्रधान मोदींना देशात पुतिन मॉडेल आणायचे आहे, संजय राऊत यांची टीका
पोलिसांकडून मुस्लिम बांधवाना गुलाब
गुरुवारी ईद निमित्त मिरा रोडच्या अल शम्स या जामा मशीद मध्ये सकाळी सातच्या सुमारास पहिली जमात होती. यावेळी शहरातील मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे आपल्या इतर अधिकाऱ्यांसह उपस्थितीत होते. यावेळी गायकवाड यांनी नमाज पठण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना गुलाबाचे वाटप केले.