भाईंदर : प्रशासकीय यंत्रणांनीच नव्हे तर लोक चळवळीनेच स्वच्छतेचे उद्दिष्ट गाठले जाऊ शकते आणि नागरिक याबाबत जागरूत झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते डीप क्लीन ड्राईव्ह ( सखोल स्वच्छता ) उपक्रमासाठी मीरा भाईंदररमध्ये उपस्थितीत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील वाढत्या प्रदूषणावर उपाय योजना आखण्याचे आदेश शासनाकडून महापालिकांना देण्यात आले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह ( खोल स्वच्छता )उपक्रमाची मीरा भाईंदरमध्येही अंमलबजावणी करण्याचा निर्णय मीरा भाईंदरचे आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे लोकार्पण करण्यासाठी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मीरा भाईंदर मध्ये आले होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिका आयुक्त संजय काटकर,आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन उपस्थितीत होते.

हेही वाचा… वसई कला क्रीडा महोत्सवा दरम्यान दुर्घटना; प्रेक्षक गॅलरी कोसळून १५ जण जखमी

यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाईंदर पूर्व येथील नवघर नाक्यावर झाडू आणि पाणी मारून हनुमान मंदिर परिसर स्वच्छ केला. याशिवाय पालिकेकडून स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी सवांद साधताना त्यांनी सांगितले की,संपूर्ण राज्य हे स्वच्छ व सुंदर करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.यासाठी टप्याटप्याने महापालिका व नगरपालिकेना डीप क्लीन मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा घेतल्या जात आहेत. यात प्रामुख्याने शहरातील अंतर्गत रस्ते, नाले, शौचालय आणि उद्यानाची स्वच्छता करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय शहरी भागातील हरित पट्टा वाढवण्यासाठी जागोजागी झाडे लावून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवल्याकडे भर देण्याचा संकल्प आहे. २०१४ साली मोदींनी देखील अशीच स्वच्छता हाती घेतल्यामुळे आज आपला देश स्वच्छ झाला आहे.त्यामुळे विरोधकांच्या टिकेकडे आम्ही लक्ष नाही देत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वागतासाठी आमदारांकडून झाडांवर बेकायदेशीर फलक.

महापालिकेच्या या स्वच्छता मोहिमेला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी हरताळ फासल्याचे दिसून आले. यामध्ये मुख्यमंत्री प्रवास करणाऱ्या मार्गांवर त्यांनी झाडांवर तसेच विद्युत खांबावर स्वागताचे बेकायदेशीर जाहिरात फलक लावले होते. त्यामुळे रस्ते चकचकित झाले असले तरी या जाहिरात फालकांमुळे शहर विद्रुप झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा… जूचंद्र उड्डाणपुलाच्या कामात निष्काळजी; खडतर पर्यायी रस्ते, धुळीचा त्रास, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

नागरिकांकडून तक्रारीचा सूर

रस्त्याची सफाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाईंदर पूर्व येथील नवघर नाका ते गोल्डन नेस्ट भागाला भेट देणार होते. त्यामुळे महापालिकेने सकाळपासूनच हा संपूर्ण रस्ता मोकळा करून या मार्गांवर लागणारे दोन्ही बाजार बंद ठेवले होते. शिवाय दुकानदारांना देखील फुटपाथवर साहित्य ठेवण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र केवळ मुख्यमंत्री येणार असल्याने पालिका पाहिलांदाच अशी कारवाई करत असून इतर वेळा या समस्यांकडे कानाडोळा करते, असे आरोप स्थानिक रहिवाशी रोहित पाटील यांनी केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In presence of chief minister eknath shinde started cleanliness campaign in mira bhayandar municipal corporation asj
Show comments