वसई: शालेय विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघालेल्या एका बसने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. विरार पूर्वेच्या गोपचरपाडा येथे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारात ही दुर्घटना घडली. सिद्धी फुटाणे असे या दुर्घटनेत मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी विरार येथील नरसिंह गोविंद वर्तक ( एन जी व्ही) या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल मुंबईत जाण्यासाठी निघाली होती. सिद्धी फुटाणे ही तरुणी आपल्या ५ वी मध्ये शिकणाऱ्या लहान भाऊ ओम याला बसमध्ये सोडण्यासाठी आली होती.
हेही वाचा : मीरा रोड दंगल प्रकरणात १० गुन्हे, १९ जणांना अटक; दंगलीमागे पूर्वनियोजित कट नसल्याचे स्पष्ट
सर्व मुले बसमध्ये बसली आणि पालक आपल्या मुलांना निरोप देत होते. यावेळी चालक बस मागे घेत असताना सिद्धीला बसची धडक लागली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सिद्धी फुटाणे या तरुणीचे वडील मुंबई पोलीस दलात आहेत. या घटनेमुळे शाळेवर शोककळा पसरली आहे. सहल रद्द करण्यात आली असून विरार पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.