वसई : प्रख्यात ‘इंडिया मार्ट’ या संकेतस्थळावर आपला माल विकण्यासाठी आलेल्या व्यापार्‍यांना फसविणार्‍या टोळ्या मिरा रोड आणि भाईंदर शहरात सक्रीय झाल्या आहेत. लाखो रुपयांच्या मालाची ऑर्डर द्यायची आणि त्याचे पैसे न देताच लंपास व्हायचे अशी ही कार्यपद्धती आहे. मुंबईतील एका हळद व्यापार्‍याची व्यापार्‍याकडून तब्बल २६ लाख रुपये किंमतीची ३५ टन हळद विकत घेत फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया मार्ट ही प्रसिध्द वाणिज्यविषयक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरून विविध व्यापारी आपल्या मालाची विक्री करत असतात. मात्र ठकसेन ग्राहक म्हणून व्यापार्‍यांना संपर्क करून त्यांना लाखोंचा गंडा घालू लागले आहेत. मुंबईच्या सायन येथे राहणारे अजय गुप्ता यांचा अशाच प्रकारे २६ लाखांची फसवणूक करण्यात आली. गुप्ता यांचा हळदीचा व्यापार आहे. इंडिया मार्ट या संकेतस्थळावरून ते हळदीची विक्री करत असतात. काही दिवसांपूर्वी गुप्ता यांना विनोद जैन नावाच्या व्यक्तीने संपर्क करून हळद विकत घ्यायची असल्याचे सांगितले. ३५ टन हळद विकत घ्यायची असल्याचे जैन याने सांगितले. त्यानुसार गुप्ता यांच्या कंपनीने मिरा रोड येथील पत्त्यावर ३५ टन हळद पोहोचवली. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत २६ लाख ४६ हजार आहे. माल मिळताच त्वरीत पैसे देणार असल्याचा व्यवहार ठरला होता.

हेही वाचा : नालासोपाऱ्यात गॅलरीचा स्लॅब कोसळला, एक जण जखमी; तीन जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

त्यानुसार गुप्ता यांनी ३५ टन हळद असलेला ट्रक आरोपी जैन याने सांगितलेल्या मिरा रोड येथील पत्त्यावर पाठवला. जैन याने २६ लाखांचा धनादेश दिला. मात्र धनादेश देताच जैन याने चेक गोठवला आणि पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्ता यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून काशिगाव पोलिसांनी विनोद जैन याच्याविरोधात ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी काशिगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत लोंढे यांनी दिली.

हेही वाचा : वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप

काजू, हळद, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सर्वाधिक फसवणूक

या संकेतस्थळावरून घाऊक विक्री होत असते. त्यात काजू, हळद, धान्य तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. ठकसेन टोळ्या या संकेतस्थळावर विक्रीसाठी आलेल्या व्यापार्‍यांना मोठी ऑर्डर देऊन फसवत असतात. एकाच वेळी लाखोंची घाऊक ऑर्डर मिळत असल्याने व्यापारी त्यांना भुलतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असतात असे पोलिसांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai 26 lakh rupees fraud of turmeric trader on online buying and selling platform india mart css