वसई : प्रेमाच्या जाळ्यात ओढून वाटेल ते करून घेण्याचा मधुजाल अर्थात हनी ट्रॅप प्रकारात भले भले फसत असतात. अशाच हनीट्रॅपचा वापर करून फेसबुकवरून श्रीमंत व्यापारी, बिल्डरांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखोंची वसुली करणार्या टोळीचा पर्दाफाश वसईतील वालीव पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात एका तरुणीसह दोघांना बेड्या घातल्या आहेत. त्यांनी अशाप्रकारे अनेक गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यातील फिर्यादी ५५ वर्षांचा बिल्डर आहे. त्याची फेसबुकवर साहिबा बक्षी नामक २९ वर्षीय तरुणीची ओळख झाली. बिल्डर त्या सुंदर तरुणीच्या जाळ्यात फसला. बिल्डर तिच्या घरी तिला भेटायला जाऊ लागला. काही दिवसांनी तिने गर्भवती असल्याचे सांगितले. हा प्रकार तिच्या दोन भावांना कळला. मनिष सेठ (४८) आणि नफिस शेख (२९)नावाच्या भावांनी माझ्या बहिणीशी संबंध ठेवले तिला गर्भवती केलं असं सागून धमकावलं. हे प्रकरण मिटविण्यासाठी तब्बल २ कोटी मागितले. बिल्डर घाबरला. त्याने ५० लाख देण्याचे ठरले आणि त्यापैकी १९ लाख रुपये दिले. या टोळीची पहिली योजना यशस्वी झाली होती.
हेही वाचा : वसई विरार महापालिकेकडून जागेचा शोध सुरू, आतापर्यंत शोधले ६८ भूखंड
पुन्हा दुसर्या जाळ्यात फसवले..
या प्रकरणातून सुटका झाल्याने बिल्डरचा जीव भांड्यात पडला होता. तेव्हा साहिबा आणि तिच्या दोन कथित भावांनी आणखी एक जाळं फेकलं. बिल्डरची जागा एका प्रकल्पात जाणार होती. त्यासाठी अधिकार्यांची सेटींग करून २५ कोटी मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी खोटे नकाशे वगैरे तयार केले. बिल्डरने त्यांच्यावर विश्वास ठेवून १७ लाख रुपये दिले. मात्र यानंतर या त्रिकुट पसार झाले. तेव्हा बिल्डरला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
हेही वाचा : नागरिक वाहतूक कोंडीला वैतागले आणि स्वतःच सुरू केली वर्सोवा खाडीवरील नवी मार्गिका
या प्रकरणी वालीव पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात खंडणी, फसणुकीच्या कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ४०६, ४११, १२० (ब)३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहे. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून शोध सुरू केला. यानंतर एका आरोपीला वज्रेश्वरी येथून गुजरात आणि राजस्थान येथून तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून खंडणीच्या आधारे उकळलेले ७ लाख ८८ हजार रुपये तसेच दोन गाड्या आदी मिळून २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींविरोधात अशाच प्रकारे हनीट्रॅप करून खंडणी उकळल्याचे दोन गुन्हे वालीव पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपींनी आणखी अनेक जणांची अशाप्रकारे फसवणूक केली असल्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.