वसई : राज्य शासनाने दिलेल्या आपला दवाखान्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वसई विरार महापालिकेने कंबर कसली आहे. जागा आणि डॉक्टरांची अडचण असली तरी अधिकाअधिक दवाखाने सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दहा कंटेनर आणले आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत २२ आपला दवाखाना सुरू करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. वसई विरार महापालिकेकडून २ रुग्णालये, ३ माता बाल संगोपन केंद्र, २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ३ दवाखाने कार्यरत असून यातून नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली जात आहे. सर्वसामान्य रुग्णांना लहान मोठ्या आजारांचे वेळीच निदान व्हावे आणि घराजवळ मोफत उपचार व्हावेत या उद्देशाने राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आला. यानंतर राज्यातील सर्वच महापालिकांना आणखी आपला दवाखाना सुरू करण्याचे वेगवेगळे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी वसई विरार महापालिकेला ५५ आपला दवाखाना सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. पालिकेने आतापर्यंत ८ ठिकाणी आपला दवाखाना सुरू केलेला आहे. उर्वरित आपला दवाखाना सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा : अभिनेत्री बनण्याचं आमिष दाखवून शूट केले नग्न व्हिडीओ; पालघरमधील धक्कादायक प्रकार कसा झाला उघड?

“आपला दवाखाना सुरू करण्यासाठी जागेची अडचण होती. त्यासाठी पालिकेने खासगी जागा घेण्यासाठी जाहिरात दिली होती. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी पालिकेने कंटेनरमध्ये दवाखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० कंटेनर आणण्यात आले आहे. या १० कंटेनरमध्ये दहा ‘आपला दवाखाना’ सुरू केले जाणार आहेत. विरारच्या मनवेलपाडा येथे कंटेनर मधील आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. सध्या आमच्याकडे ८ ‘आपला दवाखाना’ सुरू आहेत. ४ दवाखान्यांचे काम प्रगतीपथावर आहे. कंटनेरमधील १० आपला दवाखाना लगेच सुरू करण्यात येतील. त्यामुळे जानेवारी महिन्यात २२ आपला दवाखाना सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (आरोग्य) विनोद डवले यांनी दिली.

हेही वाचा : वसई : सुरुची समुद्रकिनारी बुडणाऱ्या तरुणींचे जीवरक्षकांनी वाचविले प्राण

डॉक्टरांची अडचण कायम

‘आपला दवाखाना’साठी एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र दोन वेळा जाहिरात देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत पालिकेकडे केवळ ३ एमबीबीएस डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आहे. एमबीबीएस डॉक्टरांना पालिकेकडून मिळणारे वेतन कमी असल्याने ते पालिकेच्या सेवेत यायला नाखुष असतात. त्यामुळे किमान बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव विचाराधीन आहे.

हेही वाचा : वसईतील बेकायदेशीर लॅब प्रकरण : डॉ. राजेश सोनी याची वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसल्याचे स्पष्ट

काय आहे आपला दवाखाना

राज्य शासनाने राज्यात ७०० हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा आपला दवाखाना राज्य शासनाच्या अनुदानातून सुरू करण्यात येत आहे. या दवाखान्यांमधून ३० प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात. प्रत्येक दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची नियुक्ती असते. दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी असेल. चार वर्षांसाठी लागणाऱ्या निधीची देखील तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai aapla dawakhana in container as space and doctors problem continues css
Show comments