वसई : पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आणि संचित रजा ( पॅरोल) घेऊन फरार झालेल्या एका आरोपीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. तब्बल पाच वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. वसई पूर्वेच्या नवजीवन येथे राहणाऱ्या मोहम्मद जावेद अली हुसेन अन्सारी (२८) याने ८ डिसेंबर २०१९ रोजी पत्नी गुलिस्ता अन्सारी (२२) हिची हत्या केली होती. २०१९ मध्ये त्याला वालीव पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, करोना काळ सुरू झाला होता. तुरुंगामध्ये कैद्यांना जास्त कधी ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक आरोपींना जामीन देण्यात येत होता तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींना संचित रजा (पॅरोल) मंजूर करण्यात येत होती. त्याचा फायदा मोहम्मद अन्सारीने उचलला. त्याने न्यायालयाकडून संचित रजा मंजूर करवून घेतली आणि बाहेर आला. त्याने नियमित न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु, संचित रजा मिळताच तो फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता.
हेही वाचा : मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
दरम्यान, त्याच्या मागावर असणाऱ्या वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला आरोपी मोहम्मद अन्सारी वसईत लपल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज प्रणावरे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ( डिटेक्शन ब्रांच) सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप तसेच सचिन दोरकर, मनोज मोरे, बाळू कुटे, विनायक राऊत आदींच्या पथकाने सापळा लावून आरोपी मोहम्मद अन्सारी याला अटक केली.