वसई : प्रसिध्द संकेतस्थळांवर घरांची जाहिरात करून सर्वसामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन ठकसेनांना नालासोपारा येथील आचोळे पोलिसांनी अटक केली आहे. अस्तित्वात नसेलल्या इमारतींमधील सदनिका विक्री करून त्यांनी नागरिकांना गंडा घातला होता. त्यांच्याकडून फसवणूकीचे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. नागरिकांना कमिशनशिवाय थेट घरे विक्री करणारी अनेक संकेतस्थळे कार्यरत आहेत. नागरिक देखील अशा घरांना पसंती देत असतात.

याचाच फायदा वसईत राहणाऱ्या सुमीत दुबे (३०) या ठकसेनाने घेतला. त्याने टु स्टार रिॲलिटी ही बोगस कंपनी तयार केली. महालक्ष्मी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सच्या नावाने त्याने नो ब्रोकर, ऑनलाईन ओएलएक्स या संकेतसस्थळांवर घरांची जाहिरात केली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींची छायाचित्रे अपलोड करून नागरिकांची दिशाभूल करायचा. अस्तित्वात नसलेल्या सदनिका नागरिकांना विक्री करायचा. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कर्ज घेऊन ती रक्कम परस्पर लंपास देखील करत होता.

हेही वाचा : धर्मप्रसारकांविरोधात गुन्हे दाखल, हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप

या प्रकरणी आचोळे पोलिसांनी सुमीत दुबे आणि त्याचा साथीदार शुभम उर्फ बाबा गणेश मिश्रा या दोघांना अटक केली आहे. त्यानी स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली अनेक जणांची अशाप्रकारे फसवणूक केली होती. १ हजारांहून अधिक जणांना त्याने गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांच्याकडून अशाप्रकारे फसवणूक केलेले माणिकपूर, आचोळे, तुळींज आदी विविध पोलीस ठाण्यातील ९ गुन्हे उघडकीस आणले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे (गुन्हे) आदींच्या पथकाने या ठकसेनांना अटक केली आहे

Story img Loader