वसई : नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मालवाहतूक वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत पाच ते सहा मालवाहतूक वाहने जळून खाक झाली आहेत. नालासोपारा पूर्वेच्या भागात धानिव बाग परिसर आहे. या परिसरात मालवाहतूक वाहने ही पार्किंग करण्यात आली होती. परंतु रात्रीच्या सुमारास या वाहनांमध्ये अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला होता.
हेही वाचा : अखेर महानगर पालिकेच्या पाणीपट्टी दराचे समानीकरण; कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीनंतर पालिकेला जाग
आगीची तीव्रता अधिक असल्याने यात पाच ते सहा वाहनांनी पेट घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एक ते दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या घडलेल्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून आगीत पाच ते सहा मालवाहतूक वाहने जळून खाक झाली आहेत असे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती