वसई : ‘कर्जाचे हप्ते नाही दिले तर गंभीर परिणाम होतील’, ‘नोकरी घालवून रस्त्याव आणू..’ या धमक्या कुणा सर्वसामान्य माणसांना नाहीत तर चक्क वसईतील अनेक पोलीस अधिकार्‍यांना आल्या आहेत. अॅक्सीस बँकेच्या कर्जवसुली करणार्‍या एजंटकडून या धमक्या सातत्याने येत आहेत. याप्रकरणी वसई पोलिसांनी ॲक्सीस बँकेच्या कर्ज वसुली करणार्‍या एजंटांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलीस आहे हे माहित असूनही या धमक्या गेल्या काही दिवसांपासून देण्यात येत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्ज वसुली करणार्‍या (रिकव्हरी एजंट)ची दादागिरी सर्वसामान्यांना नवीन नाही. कर्जाचे हप्ते थकले की बँकांचे खासगी एजंट फोन करून धमक्या देत असतात. या धमक्यांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहे. या एजंटांचा त्रास किती भयानक असतो, त्याचा प्रत्यय वसई पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना आला आहे. वसई पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने अॅक्सीस बँकेकडून साडेसहा लाखांचे खासगी कर्ज घेतले होते. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्याला तीन हप्ते भरता आले नव्हते. त्याची रक्कम ४५ हजार एवढी थकली होती. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी या पोलीसाला तसेच त्याच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना धमक्यांचे फोन जाऊ लागले. मात्र त्याही पुढे जाऊन हा पोलीस ज्या पोलीस ठाण्यात काम करतो तेथील अधिकार्‍यांना वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमक्यांचे फोन येऊ लागले.

हेही वाचा : मॅरेथॉनसाठी वसई विरार महापालिका सज्ज

तुमच्या सहकार्‍याने आमचे ३ हप्ते थकवले आहे. ते पैसे तुम्ही भरा किंवा त्याला हजर करा, असे सांगण्यात आले. वास्तविक त्या पोलिसाचे कर्ज वैयक्तिक होते. इतरांचा काही संबंध नव्हता. परंतु कर्ज वसुली करणारे एजंट सर्व पोलीस अधिकार्‍यांना वेगवेगळ्या क्रमांकाने फोन करून धमकावत होते. विशेष म्हणजे पोलीस आहे, हे माहित असूनही ते धमक्या देत होते. ‘तुम्ही पोलीस असला तरी नोकरी घालवू, रस्त्यावर आणून बरबाद करू’, अशा प्रकारे तसेच शिवराळ भाषेत फोन करत होते. फोन करणार्‍यांमध्ये महिलांचा समावेश होता. यामुळे पोलिसांना अॅक्सीस बँकेच्या ८ मोबाईल क्रमांकांवरून फोन करणार्‍या महिलांविरोधात वसई पोलीस ठाण्यात खंडणीच्या कलम ३८५, ३८७, १८६ तसेच ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. १ नोव्हेंबर पासून पोलिसांना या धमक्यांचे फोन येत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही तक्रार दाखल केली.

हेही वाचा : शहरबात : प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान

कर्जवसुली करणार्‍या या एजंटांची दादागिरी प्रचंड आहे. ते जर काहीही संबंध नसताना पोलिसांना अशा धमक्या देत असतील तर सर्वसामान्यांचे काय होत असेल? म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली आहे. बँकेने या एजंटला नेमले असल्याने बँक देखील जबाबदार आहे. चौकशीमध्ये सर्वांवर कारवाई केली जाईल, असेही आंधळे यांनी सांगितले.

मोबाईल नंबर मिळतात कसे?

कर्ज वसुली करणार्‍या लोकांनी पोलीस ठाण्यातील अनेक अधिकार्‍यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर फोन केला होता. त्यांना हे नंबर कुठून मिळाले हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे. जी व्यक्ती कर्ज घेते त्याच्याशी संबंधित लोकांचे मोबाईल नंबर या एजंटकडे जाणे हे गंभीर असून नागरिकांची खासगी माहिती गोपनीय रहात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : विरारच्या म्हाडा वसाहतीत आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट केंद्र, दोन वर्षात ३०० मुलींचा देहव्यावापार

“हे प्रकरण केवळ पोलिसांना दिलेल्या धमकीचे नाही. सर्वसामान्य नागरिकांना अशाप्रकारे धमकावून त्यांना त्रास दिला जात आहे. कर्जाचे हफ्ते थकले असले तर ते वसुल कऱण्याचे कायदेशीर मार्ग आहेत. मात्र अशा प्रकारे धमकावणे हे गंभीर आहे. आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन छडा लावणार आहोत.” – रणजीत आंधळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वसई

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai axis bank loan recovery agents threatened police officers to terminate from the service css