वसई: समाजवादी चळवळीचे नेते आणि बर्वे एज्युकेशन ट्रस्टचे सचिव सुरेश वायंकरण यांचे बुधवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. ते अविवाहित होते. त्यांच्यावर पाचूबंदर येथील स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसईतील प्रसिध्द बर्वे एज्युकेशन ट्रस्टतर्फे न्यू इंग्लिश स्कूल आहे. या ट्रस्टचे सचिव आणि समाजवादी नेते सुरेश वायंकरण यांनी बुधवारी सकाळी वसई येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दुपारी १२ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी शाळेच्या आवारात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी वसईच्या पाचूबंदर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुला वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा : वसई: खैर तस्करीवर मांडवी वनविभागाची कारवाई, ७६८ नग खैर जप्त
१९७९ पासून वायंकणकर हे सलग ४५ वर्ष ट्रस्टचे सचिव होते. दरम्यान, ते वसई नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून काम करत होते. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होेते. म.गो.परूळेकर, स.गो. वर्टी यांच्या प्रेरणेने ते तरुणपणीच सेवादलात सक्रीय झाले आणि आपले संपूर्ण जीवन सामाजिक कार्याला अर्पण केले. न्यू इंग्लिश शाळेला त्यांनी नावारूपाला आणले आणि अधिकाअधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्यासाठी प्रयत्न केले. नगरसेवक असातना हाताने मैला उचलण्याची प्रथा त्यांनी बंद केली होती. सामाजिक कार्यासाठी ते आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतण्या असा परिवार आहे. निस्पृहपणे त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले. शिक्षणक्षेत्रातील भीष्मपितामह म्हणून त्यांची ओळख होती.
बुधवारी दुपारी झालेल्या अंत्यविधीला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार विवेक पंडित, माजी महापौर राजीव पाटील, माजी स्थायीसमिती सभापती जीतू शहा तसेच शिक्षण, राजकारण, सहकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : नालासोपार्यात ७ वर्षांच्या चिमुकलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार
वसईच्या शैक्षणिक चळवळीतील भीष्मपितामह गमावला आहे. त्यांनी निस्वार्थी भावनेने आपले जीवन शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले होते, अशी प्रतिक्रिया न्यू इंग्लिश शाळेचे माजी मुख्याध्यापक माणिकराव दुतोंडे यांनी व्यक्त केली. गोरगरिबांची सेवा करणारे, शिक्षण क्षेत्रातील जाणाता राजा हरपला अशी प्रतिक्रिया बर्वे एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष बबन नाईक यांनी दिली.