वसई: बहुजन विकास आघाडीमध्ये गेल्या दिवसांपासून निर्माण झालेलं बंड अखेर शमलं आहे. पक्षाचे दिग्गज नेेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे बंधू राजीव पाटील यांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले असून तसा निरोप भाजपाला दिला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आणि पक्षातील दोन क्रमांकाचे नेते आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी बविआची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांची ईच्छा सुरू होती. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. यामुळे वसई विरारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. राजीव पाटील यांनी भाजपाच्या कार्यक्रमांत देखील हजेरी लावण्यास सुरूवात केली होती. यामुळे बहुजन विकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, राजीव पाटील यांचा भाजप प्रवेश सतत लांबणीवर पडत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये देखील चलबिचल निर्माण झाली होती. शनिवारी सकाळी राजीव पाटील यांनी मी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करत या वादावर पडदा टाकला आहे.

हेही वाचा : शहरबात: आदिवासींच्या ‘सत्याग्रह’ने प्रशासन जागरूक

…आईची भावनिक साद

राजीव पाटील यांच्या मातोश्री या ८९ वर्षांच्या आहेत. राजीव पाटील यांच्या बंडामुळे त्या कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी जेवण सोडलं होतं तसेच राजीव पाटील यांच्याशी बोलणंही टाकलं होतं, अशी माहिती सुत्रांनी दिली. सर्व आपले कुटुंब आहे. आपल्याच भावा आणि पुतण्यासमोर का लढतोय? हे योग्य नाही अशी भावनिक साद घालत पाटील यांच्या आईने समजूत काढली. शुक्रवारी राजीव पाटील यांच्या दोन्ही बंधूनी कौटुंबिक बैठक घेऊन या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले. आईने धरलेला अबोला, पक्षाशी असलेले भावनिक नाते यामुळे राजीव पाटील यांनी माघार घेतली आहे. मला निवडणूक लढवायची नाही, असे त्यांनी जाहीर केले आणि तसा निरोपही भाजपाला दिला आहे. राजीव पाटील हे पक्ष सोडून जातील अशा वावड्या सातत्याने उठत होत्या. अखेर ही देखील अशीच एक वावडी ठरल्याचे बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

हेही वाचा : वसई: मांत्रिकांनी घातला तरूणीला लाखोंचा गंडा

भाजपातूनही होता विरोध..

राजीव पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे भाजपात दोन गट पडले होते. एका गटाने राजीव पाटील यांना जोरदार विरोध केला होता. अनेक तक्रारीही दिल्ली पर्यंत करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी नालासोपारा येथे यासंदर्भात बैठकही झाली होती. त्यामुळे राजीव पाटील यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडत होता. पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करावी ही पाटील यांची मागणीही भाजपाने मान्य केली नव्हती. एकीकडे भाजपामधील लांबलेला प्रवेश, विरोध आणि कुटु्ंबाने घातलेली भावनिक साद यामुळे राजीव पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय तूर्तास मागे घेतला आहे.

कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर मी आता निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निरोप मी भाजपाला दिला आहे. – राजीव पाटील, बहुजन विकास आघाडीचे नेते

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai bva hitendra thakur s brother rajeev patil will not contest from bjp after emotional appeal of mother css