वसई: डहाणू येथील सुकड आंबा शिरसोनपाडा येथे जलकुंभाचा स्लॅब कोसळून दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर शहरातील जलकुंभाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसईच्या भागातही अनेक वर्षे जुने जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहेत. त्याचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून उपाययोजना करावी अशी मागणी पुढे आली आहे.
वसई विरार शहरात महापालिका व महाराष्ट्र जलजीवन मिशन प्राधिकरण यांच्या मार्फत विविध ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आले आहेत. यात पालिकेचे ४३ व जलजीवन पालिकेच्या क्षेत्रात ५२ व अन्य ग्रामीण भागात १७ असे जलकुंभ आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना ६९ गावांच्या पाणी योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी जागोजागी जलकुंभ उभे केले आहेत. मात्र अजूनही या जलकुंभा पर्यंत पाणीच पोहचले नसल्याने मागील पंधरा वर्षांपासून हे जलकुंभ कोरडेच आहेत. यात वसई पूर्वेच्या कामण, देवदळ, चिंचोटी लाईनपाडा येथील जलकुंभाची तर विरारच्या खानिवडे येथील जलकुंभाची अवस्था अधिकच बिकट बनली आहे.
हे जलकुंभ बनले तेव्हापासून यात एकही थेंब पाणी आले नाही त्यामुळे वापरा विनाच हे पडून आहेत. विशेषतःचिंचोटी येथील जलकुंभ हा अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जवळ असून हवा आली तरी हलत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. नुकताच डहाणू येथील सुकड आंबा येथे जलजीवन मिशन जलकुंभाचा स्लॅब कोसळून दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता.तर एक मुलगी जखमी झाली होती.
या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात अशा धोकादायक व वापरा विनाच उभ्या असलेल्या जलकुंभाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नागरिक आक्रमक झाले असून शहरातील सर्वच जलकुंभाची तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. गावातील नागरिकांना पाणी टंचाई तर भेडसावत आहे. तर दुसरीकडे जे जलकुंभ तयार केले ते सुद्धा वापराविनाच धोकादायक झाले आहेत.त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन दुर्घटना होण्या आधीच जमीनदोस्त करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत पालिकेला २०२३ पासून लक्ष देण्यास सांगत आहोत मात्र अजूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही असेही म्हात्रे यांनी सांगितले आहे.
धोकादायक जलकुंभ जमीनदोस्त करा
वसई विरार शहरात अनेक जलकुंभ हे वापरा विनाच पडून आहेत. त्यामुळे ते अतिशय जीर्ण झाले आहेत. काही ठिकाणी तर ते जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.यासाठी जे धोकादायक आहेत ते तातडीने जमीनदोस्त करा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
जलकुंभाचे संरचनात्मक लेखापरीक्षण केल्याचा दावा
वसई विरार मध्ये ६९ गावांच्या पाणी योजनेअंतर्गत जलकुंभ उभारले आहेत. त्यातील ५२ जलकुंभ हे पालिकेच्या कार्यक्षेत्रात येत आहेत. तर उर्वरित १७ जलकुंभ आहेत त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत लक्ष दिले जात आहे. नुकताच १७ जलकुंभाचे संरचनात्मक लेखापरीक्षण ( स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले आहे. तसे अहवाल तयार केले असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी सहायक अभियंता प्रज्वल भोईर यांनी सांगितले आहे. तसेच वेळोवेळी या जलकुंभाची स्थिती जाणून घेतली जात असून त्यात पाणी पोहचावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.