वसई : फसवणूक करण्यासाठी सायबर भामटे नवनवीन शक्कल लढवत असतात. आता निनावी पत्र पाठवून फसवणूक करण्याचा नवीन प्रकार सुरू झाला आहे. एक अनोळखी महिला लोकांच्या घरात जाते आणि हातात एक पत्र देते. हे पत्र उघडतात लोकं त्यांच्या जाळ्यात फसतात अशी ही योजना असते. विरारमध्ये अशा प्रकारे एका तरुणीला साडेतीन लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी १८ वर्षांची असून एका नामांकित महाविद्यालयीन विद्यार्थीनी आहे. १७ जुलै रोजी ती घरात असताना एक अनोळखी महिला तिच्या घरी आली. फिर्यादीने दार उघडताच त्या अनोळखी महिलेने तिच्या हातात एक निनावी पाकीट दिले आणि ती महिला लगेच निघून गेली. या पाकिटावर फिर्यादीचे नाव आणि पत्ता होता. तरुणीने ते पाकीट उघडले. त्यात असलेल्या पत्रावर एक क्रॅश कूपन होते. ते स्क्रॅच केल्यास तुम्हाला साडेसहा लाख रुपये बक्षिस मिळतील असा मजकूर पत्रात होता आणि त्याखाली एक क्रमांक होता.
हेही वाचा : वसई : विरारमध्ये जानेवारीत रंगणार १९ वे जागतिक मराठी संमेलन
तरुणीने उत्सुकतेपोटी ते क्रॅश कूपन स्कॅच केले आणि पत्रावरील क्रमांकाला संपर्क केला. आम्ही मेशो कंपनीतून बोलत असून तुम्हाला साडेसहा लाखांचे बक्षिस लागल्याचे सांगून तरुणीचे अभिनंदन केले. बक्षिसाची रक्कम खात्यावर पाठवली जाईल असेही त्यांनी कळवले. ती तरुणी भामट्यांच्या या जाळ्यात फसली. तिचा भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला. बक्षीसाची रक्कम हाती देण्याचा नावाखाली तिच्याकडून वेगवेगळे शुल्कापोटी साडेतीन लाख घेण्यात आले. तिने विविध ४ बँक खात्यांवर ही रक्कम भरली होती. मात्र तुमचे खाते गोठवले गेल्याने होल्ड रक्कम पाठवण्यात अडचण येत आहे असे सांगून तिची बोळवण केली. तिने काही दिवस वाट पाहिली परंतु तिच्या संपर्कात असणार्या मेशो कंपनीच्या चारही जणांचे फोन बंद झाले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने शनिवारी रात्री विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. १७ जुलै ते २० जुलै या चार दिवसात हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नागरगोजे या प्रकरणाचा तपास करत आहेत. रात्री उशीरा आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल असे नागरगोजे यांनी सांगितले.
हेही वाचा : वसई : काढायला गेली कॅप, डॉक्टरने काढला दात; डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल
वडिलांकडून घेतले होते पैसे..
माझ्या घरी पाकीट घेऊन आलेल्या महिलेला मी ओळखत नाही. मात्र त्या पाकिटावर माझे नाव आणि पत्ता होते. मला वाटलं कुणी तरी पत्र पाठवलं असेल म्हणून मी ते घेतलं असे फिर्यादी तरुणीने सांगितले. ती महिला मात्र लगेच निघून गेली. मी त्यांच्या जाळ्यात फसले. माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी वडिलांकडून पैसे घेतले होते. त्यांना मी हा प्रकार सांगितला नव्हता असे फिर्यादी तरूणी म्हणाली. मी फसले पण कुणीही अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन तिने केले आहे. आपली माहिती, पत्ता फोन नंबर या ठकसेनांना कसा मिळतो? असा सवाल करून आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहिलेली नाही, असेही तिने सांगितले.