वसई : सावत्र वडिलांकडून होणार्‍या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला केला. सोमवारी दुपारी तीन च्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्याच मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रिती शुक्ला (२४) ही तरुणी नालासोपारा पुर्वेच्या संतोषभुवन येथील सर्वोदनय नगर चाळीत रहात होते. तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील रमेश भारती हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीरसंबंध बनविण्यासाठी दबाव टाकला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रमेश भारती याने शरीरसंबंधाची मागणी केल्यावर तिने हल्ल्याची योजना बनवली. हे करण्यासाठी लाज वाटते असे सांगून तिच्या वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मग अचानक हल्ला केला आणि गुप्तांग कापून टाकले. रक्तबंबाळ अवस्थेत रमेश भारती घराबाहेर गेला तेव्हा तिने रस्त्यात गाठून त्याच्यावर सपासप वार केले. माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याने मी हल्ला केला असे तिने लोकांना सांगितले. हातात चाकू घेऊन फिरत असलेला या तरुणीची व्हिडियो देखील स्थानिकांना काढला आहे. सध्या तुळींज पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.