वसई: वेळेच्या कमतरतेमुळे एका आयटी अभियंता असलेल्या तरूणीने घरातच आगळ्यावेगळ्या पध्दतीने वटसावित्रीचा सण साजरा केला. घराच्या मध्यभागी लॅपटॉप ठेवून त्यात वडाचे छायाचित्र डाऊनलोड केले आणि लॅपटॉपलाच फेर्‍या घातल्या. सासूने देखील सुनेला साथ देत या आधुनिक पध्दतीने लॅपटॉपला फेर्‍या मारून वटसावित्रिचा सण अनोख्या पघ्दतीने साजरा केला.

मंगल पवार या नालासोपारा येथे रहात होत्या. दरवर्षी ते वडाच्या झाडाला पारंपरिक पध्दतीने फेर्‍या घालून वटपौर्णिमेचा सण साजरा करत असतात. नुकतेच त्या गोरेगाव येथे मुलाकडे राहण्यासाठी गेल्या आहेत. त्यांची सून तृप्ती पवार (३२) ही आयटी अभियंता असून बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. करोना काळापासून ‘वर्क फ्रॉम होम’ पध्दत सुरू झाली आहे. मात्र ते काम देखील प्रचंड असतं. त्यात वटसावित्रीचा सण हा शुक्रवारी आला. त्यामुळे काम सोडून बाहेर वडाचं झाड शोधणं कठीण होतं. त्यामुळे मंगल पवार यांनी वडाच्या छाडाची फांदी आणून घरी सण साजरा करण्याबाबत सुचवले. मात्र सुनेला ते संयुक्तिक वाटले नाही.

हेही वाचा : आरती यादव हत्या प्रकरण: हत्येचे चित्रण करणार्‍या १४ जणांचे नोंदविले जबाब

वेळ कमी असला तरी सण साजरा करायचा होता. त्यामुळे सुन तृप्तीने अभिनव संकल्पना सुचवली. लॅपटॉप ऑन करून इंटरनेटवरून वडाच्या झाडाचे चित्र डाऊनलोड केले. ते चित्र होम स्क्रिनवर ठेवले. लॅपटॉप घराच्या मध्यभागी स्टूलवर ठेवला आणि त्याला हार घातला. त्यानंतर सासू मंगल आणि सून तृप्ती यांनी लॅपटॉपला धारा बांधून फेर्‍या घातल्या. पांरपरिक सणाला आधुनिकतेची जोड देऊन आम्ही हा सण साजरा केला असे मंगल पवार यांनी सांगितले. लॅपटॉप ऑन करून त्यात वडाचे छायाचित्र ठेवले होते. ते प्रतिकात्मक होते. त्यामुळे आम्ही वडाच्या झाडाऐवजी लॅपटॉपला फेर्‍या मारल्या असे तृप्ती यांनी सांगितले.