वसई : शनिवार पासून बेपत्ता असलेल्या ८ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह सोमवारी एका बंद खोलीत आढळून आला आहे. चांदनी साह असे या मयत मुलीचे नाव आहे. वसई पूर्वेच्या वाण्याचा पाडा येथे चांदनी साह (८) ही मुलगी आई वडील आणि भावंडासह रहात होती. तिचे वडील मॅकेनिकचे काम करतात. चांदनी या परिसरातच जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरीत शिकत होती. शनिवार १ डिसेंबर रोजी ती शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून आईस्कीम घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती घराजळ खेळत असताना संध्याकाळी बेपत्ता झाली होती.

हेही वाचा : नालासोपार्‍यात एकाच वेळी १० घरांमध्ये चोरीचा प्रयत्न, नागरिक भयभीत

तिचा शोध सुरू होता. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी रात्री उशीरा पेल्हार पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. चांदनीचा शोध सुरू असताना दुपारी ३ च्या सुमारास या परिसरातील एका चाळीतील बंद खोलीत तिचा मृतदेह आढळला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पेल्हार पोलीस तसेच गुन्हे शाखा आरोपींचा शोध घेत आहेत.

Story img Loader