वसई : ‘पुढे दंगल सुरू आहे’, ‘पुढे खून झाला आहे’, ‘सेठला मुलगा झाल्याने तो साडी वाटतोय’ असं सांगून ज्येष्ठ नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. एकीकडे फसवणुकीचे ऑनलाईन गुन्हे वाढत असले तरी दुसरीकडे फसवणुकीसाठी १९८०-९० च्या दशकातील या जुन्या पध्दती आजही वापरल्या जात आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी पत्रके छापून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
ठकसेन विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची फसवणूक करत असतात. रस्त्यातून जाणार्या जेष्ठ नागरिकांना भामटे बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या अंगावरील दागिन रोख, रक्कम काढून घेत असतात. आम्ही पोलीस आहोत, ‘पुढे खून झाला आहे’, ‘साड्यांचे वाटप चालू आहे अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा अन्यछथा साडी मिळणार नाही’ असे सांगून या नागरिकांची दिशाभूल केली जाते आणि हाचचलाखीने सोन्याचे दागिने बदलून नकली दागिने दिले जातात. १९८०-९० च्या दशकात असे प्रकार सुरू झाले होते. मात्र काळ बदलला तरी अद्यापही असे गुन्हे सुरू आहेत. सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार होत असतानाही या जुन्या पध्दतीने फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यासाठी आचोेळे पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ५ हजार पत्रके छापून वाटली आहेत. कुणी अनोळखी इसम अशा प्रकारे काही सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.
हेही वाचा : माजी महापौर रुपेश जाधव यांना ईडीची नोटीस? “नोटीस बनावट, गुन्हे दाखल करणार” – रुपेश जाधव
याबाबत माहिती देताना नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, हे ठकसेन अत्यंत सराईत असतात. ज्येष्ठ नागरिकांनी बोलण्यात गुंतवून त्यांना लुबाडत असतात. आजही अशा प्रकारे फसवणूक सुरू असल्याने आम्ही पत्रके काढून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहोत. नागरिकांनी अशाप्रकारे भुलथापांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा : वसई : महापालिका करणार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, जागा निश्चित करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न
विरारमध्ये महिलेला ५६ हजारांचा गंडा
मंगळवारी विरार मध्ये सुनिता पाटोळे (६३) या महिलेला अशाच प्रकारे रस्त्यात गाठून दोन ठकसेनांनी ५६ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले आहे, पाटोळे या दुपारी विरार पश्चिमेच्या बस स्थानकाजवळून जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात गाठले. पुढे सरदार लोकं धान्य वाटत आहेत. तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पाहिल तर तुम्हाला धान्य मिळणार नाही, असे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांच्या गळ्यातील ५६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून घेतले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.