वसई: स्कायवॉकवर अश्लील चाळे करणार्या प्रेमी जोडप्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणार्या एका तोतया पोलिसाला माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल मोरे (४०) असे या आरोपीचे नाव आहे. एका जोडप्याकडून त्याने तब्बल साडेतीन लाख रुपये उकळले होते. हा तोतया पोलीस वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक म्हणून काम करत होता. मात्र गैरव्यवहारामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते.
वसई स्थानकाला लागून असलेला स्कायवॉक हा निर्मनुष्य असल्याने तेथे प्रेमी युगूल येत असतात. रात्रीच्या अंधारात अशा प्रेमी युगुलांची गर्दी असते. मात्र या युगुलांना राहुल मोरे (४०) नावाचा इसम पोलीस असल्याचे सांगून धमकावयाचा आणि पैसे उकळायचा. घरी कळू नये, पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून जोडपी घाबरून पैसे देत होती. विरार मध्ये राहणारे ४८ वर्षीय फिर्यादी आपल्या मैत्रीणीसह या स्काययवॉकवर आले होते. राहुल मोरे याने त्यांना हटकले. आपले नाव पीएसआय जगताप असल्याचे त्याने सांगितले. फिर्यादीचा फोन नंबर घेतला आणि हा प्रकार घरी सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी घाबरला होता. या प्रकऱणाची वाच्यता न करण्यासाठी त्याने फिर्यादीकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर सतत ब्लॅकमेल करत पैसे उकळू लागला. दोन महिन्याच्या काळात त्याने फिर्यादीकडून तब्बल ३ लाख ६० हजार रुपये उकळले होते.
हेही वाचा : वसई : पालिका अधिकार्याची शोकांतिका; मुलाच्या निधनाचा धक्का, हदयविकाराने झाला मृत्यू
…असे फुटले बिंग
भीतीपोटी फिर्यादी आरोपीला पैसे देत होता. एकदा आरोपी मोरे याने फिर्यादीला फोन केला. मात्र तो फोन फिर्यादीच्या पत्नीने घेतला आणि हा प्रकार लक्षात आला. प्रकरण तेवढ्यावर थांबले होते. मात्र त्यांच्या पत्नीने नंबर आपल्या मोबाईलवरून डायल केला असता ट्रू कॉलर ॲपवर राहुल मोरे नाव आले. जर फोन पीएसआय जगतापने केला तर राहुल मोरे नाव कसे? असा संशय आला आणि मग त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी राहुल मोरेच्या मुसक्या आवळून अटक केली. त्याच्याविरोधात कलम ३८४, १७०, ५० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हरीश पाटील यांनी दिली.
हेही वाचा : वसई : भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या महिलेची शोकांतिका, दुचाकी अपघातात पतीसह जागीच मृत्यू
तक्रार करण्याचे आवाहन
राहुल मोरे सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याने अनेक जोडप्यांना लुबाडल्याची शक्यता असून पोलीस त्याचा तपास करत आहे. ज्या कुणाला राहुल मोरे याने धमकावून पैसे उकळले असतील अशांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन माणिकपूर पोलिसांनी केले आहे.