वसई: वसई पूर्वेच्या सायवन चाळीस पाडा येथे तानसा नदीची पातळी वाढल्याने शेतीकामासाठी गेलेले १६ नागरिक अडकून पडले होते. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. एनडीआरएफ च्या पथकाने अडकून पडलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. वसई पूर्वेच्या भागातून तानसा नदी गेली आहे. या नदीला लागूनच अनेक गाव पाडे आहेत.
हेही वाचा : शहरबात : महावितरणचा ढिसाळ कारभार सुधारणार कधी ?
सध्या पावसाळा सुरू असल्याचे पूर्वेच्या भागात शेतीच्या कामांनी जोर धरला आहे. रविवारी सायवन चाळीस पाडा येथील १६ शेतकरी नागरिक तानसा नदी ओलांडून शेती कामासाठी गेले होते. शेतामध्ये काम करत असताना सकाळी ११च्या सुमरास तानसा धरणातून पाणी आल्याने पाण्याची पातळी अचानकपणे वाढली. त्यामुळे १६ जण शेतात अडकून पडले होते. या घटनेची माहिती महसूल विभागाला स्थानिकांनी दिली. महसूल विभागाने तातडीने एनडीआरएफचे पथक व अग्निशमन दल यांना पाचारण करण्यात आले होते. बोटींच्या साहाय्याने अडकून पडलेल्या १६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. यात ८ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे.