वसई: वसई पूर्वेच्या पोमण जवळील प्लायवूड तयार करण्यात येणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

वसई पूर्वेच्या कामण भिंवडी रस्त्या लगतच पोमण भागात लाकडी दरवाजे व इतर लाकडी साहित्य तयार करण्याचा कारखाना आहे. सोमवारी दुपारी याच कारखान्यात अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथील नागरिकांनी याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

कारखान्यात लाकडी साहित्य असल्याने आगीने जोर पकडला आहे. त्यामुळे आग नियंत्रण करताना अडचणी येत आहे. मागील तीन तासापासून अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचे कारण ही अजून समजू शकले नाही. यापूर्वी २० डिसेंबर २०२४ बापाणे येथील लाकडी साहित्य तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागली होती.

Story img Loader