वसई: विरार रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या जवळ असलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. विरार रेल्वे स्थानका प्रवाशांची मोठी वर्दळ सुरू असते. विशेषतः सकाळची वेळी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी असते. विरार रेल्वे स्थानकात असलेल्या फलाटांच्या बाजूने विविध प्रकारच्या विद्युत केबल टाकल्या आहेत.
हेही वाचा : बुलेट ट्रेन स्थानक परिसरात वसाहती, व्यवसाय केंद्र; विरार स्थानकाच्या विकासासाठी समितीची नियुक्ती
सोमवारी सकाळी अचानकपणे फलाट क्रमांक सहाच्या बाजूला असलेल्या केबल वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाले. या शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका उडाला. याशिवाय त्याचा धूर ही स्थानक परिसरात पसरला होता. या लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली होते. याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.