वसई: मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र बुधवारी सायंकाळी वसई विरार शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने जोरदार सुरुवात केल्याने कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर दुसरीकडे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.

वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे उन्हाचा उकाडा ही वाढला होता. याशिवाय धूळ प्रदूषणाने नागरिक हैराण झाले होते. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला चांगला पाऊस होईल अशी आशा होती. मात्र पावसाने दडी मारली होती. आता सप्टेंबरच्या अखेरीस पुन्हा एकदा पावसाने दमदार बरसण्यास सुरवात केली आहे. बुधवारी सायंकाळी रिमझिम पडणाऱ्या पावसाने सहा नंतर पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र दिसून आले. यासह विजांचा कडकडाट ही सुरू होता.

हेही वाचा : भाईंदर: रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण; लाईफ लाईन रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्चमार्‍यांविरोधात गुन्हा

या पावसामुळे वसई विरार शहरातील सखल भागात पाणी साचले. त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली तर पावसाचा जोर असल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला. तर दुसरीकडे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. मागील काही दिवसांपासून पाऊसच पडत नसल्याने नागरिकांनी सोबत रेनकोट, छत्री सोबत ठेवणे सोडून दिले होते. मात्र अचानकपणे झालेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली तर काहींनी भिजतच घरी जाणे पसंत केले. पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिला असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.