वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर रविवारी महापालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५० हजार चौरस फुट इतके बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. वसई विरार शहराच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहू लागली आहेत. अनेक भागात छुप्या मार्गाने ही कामे होत आहे. अनधिकृत उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने तीव्र केली आहे. अगदी सुट्टीच्या दिवशी देखील ही कारवाई केली जात आहे.

हेही वाचा : वर्सोवा खाडी सुर्याप्रकल्प दुर्घटनेत अडकून पडलेल्या चालकाच्या कुटुंबाला ५० लाखाची मदत

रविवारी महापालिकेने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत प्रभाग समिती जी मधील बापाणे येथील सर्व्हे क्रमांक १८ मध्ये अनधिकृत पणे उभारलेल्या पत्रा शेड व वीटबांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५० हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे. सदरची कारवाई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त (अतिक्रमण) अजित मुठे, प्रभाग समिती जी चे प्रभारी सहायक आयुक्त निलेश म्हात्रे,कनिष्ठ अभियंता अरुण सिंग व तुषार माळी व त्यांच्या पथकाने केली आहे.