वसई : वर्सोवा खाडी पुलाजवळ सुर्या जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान भूस्खलन होऊन पोकलेनसह चालक त्या ढिगाऱ्याखाली अडकला असल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.
वर्सोवा खाडी पुलाजवळ खाडीच्या खालील बाजूने सुर्या योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. एल अँड टी या कंपनीमार्फत काम करण्यात येत आहे. या जलवाहिन्या टाकण्यासाठी खाडीच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. बुधवारी पोकलेनच्या साहाय्याने काम सुरू असताना अचानकपणे जमिनीचा भाग खचला. यात पोकलेनसह चालक ही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे.
हेही वाचा…वसई : रिसॉर्टच्या तरणतलावात बुडून चिमुकलीचा मृत्यू, महिन्याभरातील दुसरी दुर्घटना
या घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन दल यांना मिळताच घटनास्थळी पोहचून ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या व्यक्तीला काढण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शोध कार्यासाठी एनडीआरएफ दाखल
वर्सोवा खाडी पुलाजवळ झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात भाग खचून गेला आहे. रात्रीपासूनच या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीला बाहेर
काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आता एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून त्यांच्यामार्फत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.